अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या महिला मुसलमान नेत्याने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने देवबंदकडून फतवा जारी

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील भाजपच्या नेत्या रूबी खान यांनी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. यावरून दारुल उलुम देवबंदचे प्रमुख मुफ्ती (शरियत कायद्याचे जाणकार) अरशद फारुकी यांनी खान यांच्या विरोधात फतवा जारी केला आहे. फारूकी यांनी म्हटले आहे की, घरात मूर्तीची स्थापना करणे हे इस्लामविरोधी आहे. हिंदु धर्मीय गणेशाला पूजनीय मानतात. त्याला विद्या आणि सुख-समृद्धीची देवता म्हटले जाते; पण इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. इस्लाममध्ये अल्लाखेरीज कुणाचीही पूजा केली जात नाही. जे लोक असे करतील ते इस्लामविरोधी असतील.

मी नेहमी हिंदूंचे सण साजरे करते आणि पुढेही असेच साजरे करत राहीन ! – रूबी खान

रूबी खान यांनी या फतव्याचा विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, अशा प्रकारचे फतवे जारी करणार्‍यांना या देशाची फाळणी झालेली हवी आहे. हा देश सगळ्यांचा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान यांना एकत्र रहायचे आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही फतव्याची मी काळजी करत नाही. खरे मुसलमान असे फतवे काढत नाहीत.
माझ्याविरोधात असे फतवे काढले जात असतात. असे विचार करणारे मुफ्ती  (शरीयत कायद्याचे जाणकार) आणि मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) हे कट्टरतावादी आणि जिहादी विचारांचे आहेत, ज्यांना फूट पडलेली हवी आहे. या देशात राहून ते या देशाच्या भल्याचा विचार करत नाहीत. मी नेहमी हिंदूंचे सण साजरे करते आणि पुढेही असेच साजरे करत राहीन.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?
  • हिंदूंनी मुसलमानांना मंदिरामध्ये नमाजपठण करण्याची, इफ्तार आयोजित केले, तर हिंदूंचे कौतुक करणारे मुसलमान महिलेने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केल्यावर त्याचा विरोध का केला जात आहे, याचे उत्तर कोण देणार ?