खजुराहो (मध्यप्रदेश) येथून बेपत्ता झालेली हिंदु मुलगी आगरा येथे सापडली !

प्रतीकात्मक छायाचित्र

खजुराहो – मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथून बेपत्ता झालेली २० वर्षांची हिंदु मुलगी ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी आगरा येथे पोलिसांना सापडली. मुलीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आढळले, असे आगरा येथील एम्.एम्. गेट ठाणा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुलीला आशा ज्योती केंद्रात ठेवले असून तिच्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिली आहे. याविषयीची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे अधिकारी घटनास्थळ पोचले. हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका मुसलमान मुलाने पीडित हिंदु मुलीला आमीष दाखवून पळवून नेल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलगी एक आठवड्यापूर्वी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी खजुराहो येथील राजनगर पोलीस  ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू केला. पोलिसांनी मुलीच्या भ्रमणभाषचे ठिकाण पडताळले असता ते आगरा येथील एस्.एन्. वैद्यकीय महाविद्यालय जवळ असल्याची माहिती त्यांना मिळाली.  त्यांनी जवळच्या एम्.एम्. गेट ठाणा पोलिसांनी कळवले. स्थानिक पोलीस मुलीचा शोधात रुग्णालयात पोचले आणि त्यांनी मुलीला कह्यात घेऊन तिच्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.