मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषदेतील आरोपी ज्योती जगताप हिच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) विरोध केला आहे. ‘माओवादी चळवळीत आरोपी ज्योती जगताप हिचा सक्रीय सहभाग होता, तसेच तिने शस्त्रे आणि स्फोटके बनवणे अन् त्यांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षणही घेतले होते, अशी माहिती ‘एन्.आय.ए.’ने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यानंतर पुढील २ आठवड्यांसाठी याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.
१. आरोपी ज्योती जगताप हिने स्वतःवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत जामिनासाठी येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; परंतु ‘एन्.आय.ए.’ने याचिकेला विरोध केला.
२. ‘ज्योती जगताप प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाची माओवादी सदस्य असून शहरी भागात माओवादी चळवळीचा प्रसार करत होती. यासाठी तिने शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते’, असे ‘एन्.आय.ए.’ने त्याच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
३. १ जानेवारी २०१८ या दिवशी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराला चालना देणार्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी परिषदेला माओवाद्यांचे समर्थन असल्याचे म्हटले होते, असेही ‘एन्.आय.ए.’ने म्हटले आहे.