‘सुखकर्ता दुःखहर्ता’ श्री गणपति !

‘भाद्रपद शुक्ल ४, हा दिवस श्री गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश. सत्त्व, रज, तम या त्रिगुणंचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, अशा स्वरूपाचे दैवत मानले आहे. सर्व शुभ संस्कारांमध्ये गणेशपूजा आरंभी करण्याची प्रथा आहे.

मुद्गलपुराण, गणेशपुराण, गणेशभागवत या संस्कृत आणि गणेशप्रताप, गणेशलीलामृत, गणेशविजय आदी मराठी ग्रंथांतून गणपतीच्या उत्पत्ती संबंधाने अनेक कथा आढळतात. श्री गणपतीची भक्ती करणारा संप्रदाय ‘गाणपत्य’ या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रातही या संप्रदायाचा प्रसार झाला. चिंचवडचे श्री मोरया गोसावी श्री गणेशाचे महान भक्त होऊन गेले. थोरले माधवराव पेशवे हे गणपतीचे उपासक होते. प्रसिद्ध अष्टविनायकांची ८ स्थाने महाराष्ट्रातच आहेत. कोणतीही विघ्ने आली, तरी गणपति स्वतःच्या दैवी सामर्थ्याने त्यांचा नाश करतो. यामुळे त्याला ‘विघ्नराज’, ‘विघ्नहर्ता’, अशी नावे प्राप्त झाली आहेत. नंतरच्या काळात १६ विद्या आणि ६४ कला येणार्‍या गणपतीला बुद्धी अन् विद्या यांचे स्वामित्वही प्राप्त झाले.

‘गणांनां त्वां गणपति’ हे ऋगवेदातील सूक्त गणपतीचे मानतात. गणपतीच्या जन्मकथांतून अनेक प्रकारचा अद्भुत रस मिसळलेला दृष्टीस पडतो. काही अपराधावरून भगवान शिवाने श्री गणेशाचे मस्तक तोडले; पण पार्वतीसाठी हत्तीचे मस्तक आणून त्याला बसवण्यात आले. भगवान परशुराम यांच्याशी गणपतीचे एकदा युद्ध झाले. त्या वेळी परशुरामांनी शिवाचे अस्त्र ‘परशु’ गणपतीवर फेकले; पण ते अस्त्र आपल्या वडिलांचे असल्याने गणेशाने ते स्वतःच्या दातावर झेलले. त्यामुळे गणपतीचा एक दात मोडून गेला. श्री गणेशाच्या अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत.’

(साभार : ‘दिनविशेष’)