काही वेळेस मंदिरेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागल्यास त्यांना बंद करणेच योग्य !

मंदिरातील पूजेविषयी दोन गटांतील वादावरून मद्रास उच्च न्यायालयाचे विधान !

सामाजिक माध्यमांतून न्यायालयाच्या विधानाला होत आहे विरोध !

चेन्नई (तमिळनाडू) – भाविक मंदिरांमध्ये शांततेच्या शोधासाठी जात असतात; मात्र मंदिरेच आता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या बनू लागली आहेत. त्यांचा मुख्य उद्देशच समाप्त झाला आहे. अशा प्रकरणात कारवाईचा चांगला मार्ग म्हणजे या मंदिरांना बंद करणे हाच होय. यामुळे या भागात शांतता आणि सामान्य स्थिती निर्माण होईल, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद यांनी एका मंदिरात पूजा करण्यावरून दोन गटांत असलेल्या वादावरील एका याचिकेवर सुनावणी करतांना केले. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून याचा विरोध केला जात आहे.

१. न्यायमूर्ती आनंद यांनी पुढे म्हटले की, व्यक्तीच्या अहंकाराला अल्प करण्यासाठी मंदिरामध्ये वातावरण निर्माण केले पाहिजे; मात्र याच्या उलट मंदिर लोकांच्या अहंकारातून विवादाचे केंद्र बनत आहे आणि देवाला मागे ढकलून देत आहे.

२. हे प्रकरण एका कुटुंबाशी संबंधित आहे. याचिकाकर्त्याने त्याच्या कुटुंबाच्या देवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. पूजा करण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी होत असल्याने अशी मागणी करण्यात आली होती.

३. यावर राज्यशासनाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले की, दोन गटांतील हाणामारीनंतर स्थिती सामन्य होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, अशा स्थितीत मंदिराचे व्यवस्थापन अन्य योग्य व्यक्तीकडे सोपवले पाहिजे. यामुळे दोन्ही गट स्वतःला श्रेष्ठ समजणार नाहीत.

सामाजिक माध्यमांतून टीका

मशिदी बंद करण्याचे विधान केले जातेे का ?

न्यायालयाच्या विधानांवर सामाजिक माध्यमांतून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘टोटल वोक’ (Total Woke) नावाच्या ट्विटर खात्यावर म्हटले, ‘कधी कोणत्या मुसलमान न्यायाधिशांना असे म्हणतांना ऐकले आहे का की, ‘प्रत्येक शुक्रवारी मशिदीतून दगडफेक केली जाते’, ‘अनेक घंटे भोंग्यांचा वापर केला जातो’, ‘तेथे गेल्यामुळे लोक कट्टरतावदी होतात’, ‘तेथे दंगलींचे षड्यंत्र रचले जाते’, ‘रस्ते बंद केले जातात’, ‘लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जाते’ आणि ‘महिलांना प्रवेश दिला जात नाही’ म्हणून मशिदी बंद करा !

न्यायालये काही वेळा कायदा सुव्यवस्थेच्या समस्येला जन्म देतात !

explorer Pratss नावाच्या ट्विटर खात्यावर म्हटले आहे की, न्यायालये न्यायाचे स्थान आहेत; मात्र दुर्दैवाने बहुतांश वेळ ती अन्यायाचे कारण बनतात जी कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येला जन्म देतात.