मुंबई – श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत चारचाकी वाहनाने कोकणात जाणार्या भाविकांना पथकराची आकारणी करू नये, तसेच भाविकांना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पथकर नाक्यांच्या मालकांना दिला आहे.
याविषयी शासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुंबई-बंगळुरू आणि मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवरून कोकणात जाणार्या गणेशोत्सव भाविकांकडून पथकरातून सवलत देण्यात येत आहे. यासाठी भाविकांना ‘गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन’ अशा आशयाचे ‘स्टिकर्स’ पथकर माफीचे पास म्हणून देण्यात येणार आहेत. हे पास प्रादेशिक परिवहन विभाग पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि वाहतूक पोलीस चौक्या येथे उपलब्ध करून देण्यात येतील. हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पोलीस आणि परिवहन विभागाने पास सुविधाची माहिती जनतेला उपलब्ध होण्यासाठी प्रसिद्ध करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत. पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध – मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती#गणेशोत्सव२०२२ pic.twitter.com/U5EtAsjvcO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2022