मुंबई – महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणार्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वर्ष २०१३ पासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकर संमती द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी राज्य शासनाने १६ नोव्हेंबर २०१३ या दिवशी केंद्रशासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. याविषयी सातत्याने पाठपुरावाही करण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावासलवकरात लवकर मंजूरी द्यावी याकरिता पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांच्याकडे आज पत्राद्वारे आग्रही मागणी केली.#अभिजात_मराठी@PMOIndia pic.twitter.com/AVTpg59dAe
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022
यासंदर्भात राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेंतर्गत १ लाख २० सहस्रांहून अधिक पत्रे राष्ट्रपतींना पाठवली आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेळोवेळी याविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी राज्यसभेत सांगितले आहे.