गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना तातडीने थांबवा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि सांगली महापालिका यांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सांगली, २३ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना तातडीने थांबवावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मौसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले. याच मागणीचे निवेदन सांगली, मिरज कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्तांनी समितीच्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल असे सांगितले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी बजरंग दलाचे श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. संदीप माळी, दत्तभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. विठ्ठल मुगळखोड आणि श्री. मिलिंद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर उपस्थित होत्या.