परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यात झालेली वृद्धी !

‘मी दीड वर्षापूर्वी देवद आश्रमात रहात होते. मागील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) मी सांगली येथे घरी गेल्यानंतर दळणवळण बंदीमुळे मला घरीच थांबावे लागले. आता आश्रमात आल्यानंतर मला येथील वातावरणात चांगला पालट जाणवला.  

१. गुरुदेवांच्या कृपेमुळे साधक आनंदी दिसणे

श्रीमती प्रमिला पाटील

आश्रमातील सर्व साधक पुष्कळ आनंदी दिसतात. ‘त्यांच्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण अल्प झाले आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे अनेक साधक तेजस्वी दिसत आहेत. ‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच साधकांवरील अनिष्ट शक्तींचे आवरण नष्ट होऊन साधक तेजस्वी झाले आहेत’, असे जाणवून मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता पुष्कळ वाटली.

२. ‘देवद आश्रम रामनाथी आश्रमाप्रमाणे व्हावा’, ही इच्छा गुरुदेवांनी पूर्ण केली’, असे वाटणे

मी २ वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला होता, ‘देवद आश्रम रामनाथी आश्रमासारखा कधी होणार ? रामनाथी आश्रम पाहून भाव जागृत होतो. रामनाथी आश्रमाची आठवण आली, तरीही भाव जागृत होतो, तसाच देवद आश्रमही व्हायला हवा.’ या वेळी घरून आल्यानंतर आश्रमातील चैतन्यात वृद्धी झालेली पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली’, असे मला जाणवले.

‘देवद आश्रमातील वाढलेले चैतन्य असेच टिकून राहू दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीमती प्रमिला पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०२१)

३. घरून देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात एक मासाने आल्यावर गुरुदेवांच्या कृपेमुळे येथील चैतन्यात वृद्धी झाल्याचे जाणवणे

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

३ अ. आश्रमातील काही भागांत पुष्कळ प्रकाश दिसणे : ‘५.५.२०२१ या दिवशी मी देवद आश्रमातून सांगली येथे गेले होते. त्यानंतर १५.६.२०२१ या दिवशी आश्रमात परत आल्यानंतर ‘आश्रमातील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वृद्धी झाली आहे’, असे मला जाणवले. मला आश्रमातील काही विशिष्ट भागांमध्ये पुष्कळ प्रकाश दिसत होता. ‘जणू काही त्या ठिकाणी विजेचा दिवाच लावला आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी पावसाळी वातावरण असल्यामुळे अंधारून आले होते. असे असूनही मला स्थुलातून प्रकाश जाणवत होता.

३.आ. ‘गुरुदेवांनीच आश्रमात चैतन्याचे प्रक्षेपण केले आहे’, असे वाटणे : मला ही अनुभूती आल्यानंतर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘गुरुदेवांनीच ‘साधकांना चैतन्य मिळावे’, यासाठी आश्रमात चैतन्याचे प्रक्षेपण केले आहे’, असे मला वाटले. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार करत असलेल्या प्रयत्नांमुळे आश्रमातील चैतन्यात वृद्धी होत आहे’, असेही मला वाटले.

परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता !’

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक