विधान परिषद प्रश्नोत्तरे…
मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) – बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने पोर्टल सिद्ध केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते, तसेच विविध उद्योग-आस्थापने तिथे नोंदणी करू शकतात. बेरोजगारी भत्त्याचा विषय मात्र माझ्या अखत्यारीत येत नाही. इतर विभागांशी चर्चा करून माहिती देण्यात येईल. कंत्राटी पद्धतीतील कर्मचार्यांना नियमित सेवेत घेण्याविषयी मोठा प्रश्न आहे. याविषयी विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात केले. सदस्य अभिजित वंजारी यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.
राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्लॉयमेंट एक्सचेंज) जवळपास बंद झालेले आहेत. ‘एम्लॉयमेंट एक्सचेंज’मधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या. त्या आता होत नाहीत, तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे ‘सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्येक मास ५ सहस्र रुपये भत्ता द्यावा’, अशी मागणी सदस्य एकनाथ खडसे यांनी केली. सदस्य शशिकांत शिंदे म्हणाले की, युवकांना नोकर्या देण्याविषयी कौशल्य विकास विभाग काही योजना राबवणार आहे का ? तसेच शासकीय कार्यालयामध्ये ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागेवर कंत्राटी कामगारांच्या ऐवजी शासकीय भरती करणार आहात का ?