‘ड्रगमाफिया’ कोण ?

गेल्या काही दिवसांमध्ये आणि त्यापूर्वीच्या मासांमधील अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडण्याच्या घटना अतिशय धक्कादायक आहेत. ठाणे आणि गुजरात येथे प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या ‘ड्रग्ज’चे मूल्य १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. गोणीच्या गोणी भरून हे अमली पदार्थ सापडत आहेत. पूर्वी अमली पदार्थ सापडत, तेव्हा बातम्यांचे मथळे असायचे, ‘१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले’, ‘५ कोटी रुपयांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त’ ! आता सापडलेले अमली पदार्थ म्हणावे कि अमली पदार्थांची ‘फॅक्टरी’ सापडली म्हणायचे ? एवढे त्यांचे प्रमाण अधिक आहे.

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ

वर्ष २०२१ मध्ये गुजरात येथील अदानी समुहाच्या बंदरामध्ये ३ सहस्र किलोंचे हेरॉईन सापडले होते. मार्च २०२१ मध्ये अरबी समुद्रात ४ सहस्र ९०० कोटी रुपयांचे ३०० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी नालासोपारा येथे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा ‘एम्.डी.’ या अमली पदार्थाचा ७०१ किलोंचा साठा, तर १८ ऑगस्टला गुजरात आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) कारवाईत १ सहस्र १२५ कोटी रुपयांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त केले. अमली पदार्थविरोधी मोहीम ‘अमली पदार्थ नियंत्रण विभागा’च्या स्थापनेनंतर चालू झालेली असली, तरी तिची गती मागील ५ ते ८ वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्ष २००६ ते २०१३ या कालावधीत ७६८ कोटी रुपयांचे १ लाख ५२ सहस्र किलो अमली पदार्थ जप्त, तर १ सहस्र ३६३ जणांना अटक करण्यात आली. हेच प्रमाण वर्ष २०१४ ते २०२२ या कालावधीत २० सहस्र कोटी रुपयांचे ३ लाख ३ सहस्र किलो पदार्थ जप्त आणि ४ सहस्र ८८८ जणांना अटक असे आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सातत्याने सापडणे, यामध्ये पोलिसांचे कौतुक आहेच; मात्र पुष्कळ मोठे ‘नेटवर्क’ (जाळे) आणि ‘ड्रगमाफिया’ यांमागे कार्यरत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमली पदार्थांच्या संदर्भाने विषय येतो, तेव्हा नायजेरियी नागरिकांकडे पाहिले जाते. नायजेरियाचे नागरिक यामध्ये दोषी असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत, तरीही या व्यापाराची व्याप्ती पहाता त्यामध्ये मोठ्या व्यक्ती कार्यरत असल्याचे लक्षात येते. ईशान्य भारत आणि उत्तरेकडील भाग या ठिकाणी जेथे अन्य देशांच्या सीमा भारताशी जोडल्या आहेत, तेथून अमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो, तसेच सागरी मार्गानेही या पदार्थांची तस्करी होत असते. अमली पदार्थांचा व्यापार पूर्णपणे नष्ट करणे, हे भारतापुढे तसे मोठे आव्हानच आहे. भारताने ४४ देशांसमवेत ‘अमली पदार्थ प्रतिबंधक विविध सामंजस्य करार’ केले आहेत आणि संबंधित माहितीची देवाण-घेवाण चालू केली आहे. ‘क्रिप्टोकरन्सी’ म्हणजे आभासी चलन आणि ‘डार्क वेब’ यांच्या माध्यमांतूनही अमली पदार्थांचा व्यापार चालू आहे. त्यामुळे त्याविरुद्धही कृती दल स्थापन केले आहे.

व्यवस्थेतील अडथळे दूर करावेत !

मागील मासात झालेल्या अमली पदार्थविरोधी राष्ट्रीय संमेलनाला संबोधित करतांना भारताचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘‘अमली पदार्थांविषयी अतिशय कडक धोरण अवलंबले आहे. हळूहळू व्यवस्थेतील त्रुटी दूर करून कारवाई अतिशय वेगवान आणि अभेद्य बनवली आहे. अनेक प्रशासकीय सुधारणा करण्यासह नवीन पद्धती बसवण्यात आल्या आहेत.’’ केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या भाषणामध्ये ‘व्यवस्थेतील त्रुटी’, ही अडचण महत्त्वाची आहे. भारतात कोणताही पालट करायचा असल्यास ‘व्यवस्थेची अडचण’ हाच सर्वांत मोठा अडथळा आहे. अमली पदार्थांविरुद्धचा लढा विभागाच्या स्थापनेनंतर गतीमान झाला नाही किंवा गतीमान केला गेला नाही ? ते पहाणे महत्त्वाचे आहे. या व्यापारात असलेल्या मोठ्या गुंडांचे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संबंध असू शकतात. त्यामुळे कारवाईवर परिणाम होतो किंवा कारवाईपूर्वीच संबंधितांना सतर्क केले जाते. मुंबईतील बोटीवर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मुले अमली पदार्थ सेवन करतांना सापडल्याच्या घटनेने अनेक वळणे घेतली. त्यात मूळ कारवाई बाजूला राहून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतांना जनतेने पाहिले. संबंधित अधिकार्‍यांची जात काढण्यापर्यंत राजकारण्यांची मजल गेली. यामुळे विषयाचे गांभीर्य अल्प होण्यासह जनतेचाही विश्वास उडतो.

कारणांवर समूळ उपाय हवा !

अमली पदार्थांची चटक तरुणाईला का लागते ? ते पहाणे महत्त्वाचे आहे. अमली पदार्थ पुष्कळ महाग असतात. ते सहसा उपलब्ध होत नाहीत. ते ‘ड्रग पेडलर’च्या (अमली पदार्थ विकणार्‍यांच्या) माध्यमातूनच उपलब्ध होतात. या पदार्थांची मागणी विशेषत: उच्चभ्रू वर्गात अधिक असते. जीवनातील समस्या, ताण आणि अडचणी यांच्याशी लढण्याचे मनोबल नसेल, तर मनुष्य व्यसनांच्या आहारी जातो. ते व्यसन मग कुठलेही असेल. अमली पदार्थ विक्रेत्यांचा एकदा संपर्क मिळाला की, ते सहज मागवू शकतो. सध्या अमली पदार्थांचे सेवन करणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. जरी कारवाई झाली, तरी ती जुजबी होते. या सर्व कारणांमुळेच अमली पदार्थांच्या प्रसाराची साखळी तोडता येत नाही. जीवनातील समस्या आणि अडचणी यांमुळे निराश न होता त्यांना तोंड देण्यासाठीचे मनोबल साधनेमुळेच म्हणजेच धर्माचरणामुळेच प्राप्त होऊ शकते. अमली पदार्थांविषयीची जनजागृती आणि व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे यांसह शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण देण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. समस्येच्या मुळाशी न जाता उपाययोजना केल्यास गुन्हेगार त्यावरही मार्ग काढतो आणि पुढे समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करते किंवा जटील बनते. शासनकर्ते हे लक्षात घेतील, ही अपेक्षा !