सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २२.५.२०२२ या दिवशी त्यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. त्या संदर्भात सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्यातील नारायणाप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) असलेल्या भावाविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रथोत्सवात कसलेही अडथळे येऊ नयेत आणि त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, असा भाव असलेले अन् सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य असलेले पू. वामन !
१ अ. पू. वामन यांनी पावसाला स्वतःचा मित्र मानून त्याला रथोत्सवात न येण्याविषयी सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे : ‘रथोत्सवाच्या २ दिवस आधी २० आणि २१.५.२०२२ या दिवशी पुष्कळ पाऊस पडत होता. पू. वामन नेहमी सांगतात, ‘‘पाऊस माझा मित्र आहे.’’ पू. वामन मला म्हणाले, ‘‘मी पावसाला सांगितले, ‘उद्या आपल्या नारायणाचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) रथोत्सव आहे, तर तू येऊ नकोस. रथोत्सवाची सांगता झाली की, तू ये आणि लांबूनच नारायणाचे दर्शन घे.’’ प्रत्यक्षातही दुसर्या दिवशी तसेच झाले. (पू. वामन यांनी पाऊस पडण्यासंदर्भात सांगितलेले अनुमान नेहमीच अचूक असते.) २२.५.२०२२ या रथोत्सवाच्या दिवशी सकाळीच सूर्यनारायण प्रसन्न झाले होते. आकाश निरभ्र होऊन सर्वत्र लख्ख प्रकाश पडला होता. त्या दिवशी पू. वामन थोड्या थोड्या वेळाने आकाशाकडे बघत होते.
१ आ. पू. वामन यांना ‘पोलिसांनी नारायणाच्या रथोत्सवात सहकार्य करावे’, असे वाटणे
१ आ १. पू. वामन यांनी गाडीशी खेळतांना सूक्ष्मातून पोलिसांना ‘नारायणाच्या रथोत्सवाला सहकार्य करा, साधकांना त्रास होऊ देऊ नका’, असे सांगणे : पू. वामन यांच्या खेळण्यांत पोलिसाची गाडी आहे. रथोत्सवाच्या ३ दिवस आधीपासून पू. वामन सतत या गाडीशी खेळत होते. पू. वामन खेळतांना सूक्ष्मातून पोलिसांना सांगायचे, ‘नारायणाच्या रथोत्सवाला सहकार्य करा. साधकांना त्रास होऊ देऊ नका.’ खेळतांना ते इतर गाड्यांना लांबून जायला सांगत. त्या वेळी ते खेळण्यातील गाड्यांना ‘पोलीसकाकांनी मार्ग बंद केला आहे. तुम्ही दुसर्या मार्गाने जा’, असे सांगत होते.
१ आ २. प्रत्यक्षात रथोत्सवाला आरंभ होण्यापूर्वी आश्रमाबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना बघून पू. वामन म्हणाले, ‘‘पोलीसकाका रथोत्सवाच्या वेळी साहाय्य करण्यासाठी आले आहेत.’’ (प्रत्यक्षातही पोलिसांनी रथोत्सवात पुष्कळ सहकार्य केले.)
१ इ. पू. वामन यांनी रथोत्सवाच्या वेळी सूक्ष्मातून जाणून स्वतःसाठी हिरव्या रंगाचा सदरा आणि साधिकेसाठी हिरव्या रंगाची साडी निवडणे
१ इ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ रथोत्सवाच्या वेळी परिधान करणार असलेल्या साडीचा रंग हिरवा असल्याचे सूक्ष्मातून लक्षात येताच पू. वामन यांनीही त्यानुसार कृती करणे : रथोत्सवाच्या दिवशी मी पू. वामन यांना घालण्यासाठी केशरी रंगाचा सदरा आणि मला नेसण्यासाठी आंब्याच्या रंगाची साडी काढून ठेवली होती. हे सर्व पू. वामन यांनी आधीच बघितले होते. ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अकस्मात् मला म्हणाले, ‘‘आई, मला हे कपडे घालायचे नसून हिरव्या रंगाचा सदरा घालायचा आहे आणि तूही दुसरी साडी नेस.’’ त्यांनी मला कपाटातील त्यांचा सदरा आणि माझी साडी दोन्ही स्वतः दाखवले आणि ‘हेच घालून जायचे’, असे सांगितले.
१ इ २. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. वामन यांना आपण सारख्या रंगांची वस्त्रे परिधान केली असल्याविषयी सांगणे : आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर काही वेळातच आमची श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्या साडीचा रंग आणि पू. वामन यांच्या सदर्याचा रंग, तसेच माझ्या साडीचा रंग एकसारखा असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पू. वामन यांना म्हणाल्या, ‘‘पू. वामन, किती छान ! आपण सारख्या रंगांची वस्त्रे परिधान केली आहेत. ’’
१ इ ३. पू. वामन यांनी ‘नारायणाने कपड्यांच्या रंगाविषयी सुचवले’, असे सांगणे आणि त्यांच्यामुळेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्वाचा लाभ झाल्याने साधिकेकडून कृतज्ञता व्यक्त होणे : त्या गेल्यावर पू. वामन मला म्हणाले, ‘‘या रंगाचे कपडे घालायचे’, याविषयी नारायणाने मला आधीच सांगितले होते.’’ पू. वामन यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. त्यांच्यामुळेच साक्षात् श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी नेसलेल्या साडीच्या रंगासारखीच वस्त्रे आम्ही घातल्याने त्यांच्यातील देवीतत्त्वाचा आम्हाला लाभ झाला. त्यामुळे माझ्यामध्ये कृतज्ञताभाव जागृत झाला.
२. पू. वामन रथोत्सव बघतांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
२ अ. ‘पू. वामन स्थूलदेहाने रथोत्सवाच्या ठिकाणी असले, तरीही सूक्ष्मदेहाने दुसरीकडे आहेत’, असे जाणवणे : आम्ही सकाळी रामनाथी आश्रमात पोचल्यापासून पू. वामन पुष्कळ गंभीर होते. ते रथोत्सवाची पूर्वसिद्धता करत असलेल्या साधकांकडे पुष्कळ लक्षपूर्वक बघत होते. त्या वेळी ‘पू. वामन स्थूलदेहाने तिथे असले, तरी सूक्ष्मदेहाने दुसरीकडे आहेत’, असे मला जाणवत होते.
२ आ. रथोत्सवाचा आरंभ होण्यापासून त्याची सांगता होईपर्यंत पू. वामन यांनी काहीच खाल्ले नाही. रथोत्सव झाल्यानंतरच त्यांनी अन्न ग्रहण केले.
२ इ. रथोत्सवातील तीनही गुरूंचे दर्शन होताच पू. वामन यांची भावजागृती होणे : पू. वामन यांची रथोत्सव बघतांना भावजागृती होत होती. रथोत्सवातील सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पहाताच पू. वामन यांनी स्वतःहून हात जोडून नमस्काराची मुद्रा केली. पू. वामन यांच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते.
२ ई. पू. वामन मला म्हणाले, ‘‘नारायणाची भावजागृती झाली आहे. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. सर्व साधकांना बघून त्यांना असे झाले.’’
२ उ. पू. वामन यांनी सांगितले, ‘‘नारायणाचे स्मरण केल्यावर आपल्या डोळ्यांतून पाणी येते, ती भावजागृती !’’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (६.६.२०२२)
|