पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या विरोधात हिंसक निदर्शने

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे. या सुधारणेमुळे पाकव्याप्त काश्मीरला असणारे आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार आता पाक सरकारकडे गेले आहेत. याला येथील नागरिकांकडून विरोध केला जात आहे. येथील चारहोई, कोटली, बाग, नार, चाक्सवारी, रावलकोट, नीलम घाटी, मुजफ्फराबाद आदी अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पाकने नेहमीच काश्मीरचे विभाजन करण्याचा कट रचलेला आहे. आम्हाला आशा आहे की, काश्मीर एकत्र होईल. पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान फारुक हैदर आणि पीटीआय पक्षाचे तनवीर इलयास यांनी आमच्या पाठीत सुरा खुपसला आहे.