एक प्रसिद्ध अभिनेत्री गर्भवती असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्धीमाध्यमांतून सर्वांसमोर आले. विवाहानंतर २ मासांतच ती गर्भवती झाली, इथपासून ‘ती कुठे गेली ?, कुठून आली ?, तिच्या समवेत कोण होते ?, तिचा गर्भ किती मोठा दिसत आहे ?, तिने कोणते कपडे परिधान केले होते ?’, याविषयीच्या असंख्य चर्चा प्रतिदिन चालू आहेत. ‘ती कोणत्या मासात बाळाला जन्म देईल ?, तसेच त्यासाठी तिने कोणत्या रुग्णालयात नोंदणी केली आहे ?’, याविषयीही चर्वितचर्वण चालू आहे. हे पाहून वाटते की, आजपर्यंत हीच अभिनेत्री गर्भवती राहिली आहे कि काय ? समाजात यापूर्वी गर्भवती महिला होऊन गेल्या कि नाहीत ? एखादा आधुनिक वैद्यही गर्भवतीचा दिवसादिवसाचा किंवा क्षणाक्षणाचा तपशील ठेवत नसेल, इतका सखोल अभ्यास ही प्रसिद्धीमाध्यमे अभिनेत्रीच्या गर्भारपणाचा ठेवत आहेत. जणू काही ‘त्यांनीच तिच्या गर्भारपणाचा भार उचलला आहे कि काय ?’, असे त्या वृत्तांवरून वाटते. हे सर्व पहाता ‘प्रसिद्धीमाध्यमांना स्वतःच्या दायित्वाची तरी जाण आहे का ?’, हाच प्रश्न पडतो. एखादी अभिनेत्री गर्भवती झाली की, अगदी तिचे दिवस भरेपर्यंत तिला प्रसिद्धी दिली जाते; पण एखादी सामान्य महिला जर गर्भवती झाली, तर तिला कुठे मिळते प्रसिद्धी ? खरे पहाता ती तर स्वतःचे घर, कुटुंब, नोकरी आणि व्यवसाय या सगळ्या तारेवरच्या कसरती करत गर्भाला जपत असते. तिच्या दिमतीला नोकर-चाकर, गाड्या किंवा आलिशान बंगला नसतो. तरीही ती प्रतिदिन वाटचाल करते. धक्केबुक्के खात प्रवास करते. खेदाची गोष्ट म्हणजे या प्रतिकूलतेला कधीच प्रसिद्धी मिळत नाही. अशा गर्भवती महिलांच्या आयुष्याचा प्रवास जनतेसमोर आणला जात नाही. याचे कारण एकच ते म्हणजे त्या वलयांकित व्यक्ती नसतात. त्यांच्या अवतीभवती कॅमेरे नसतात. त्यांना प्रसिद्धी द्यायची म्हटली, तर टी.आर्.पी. (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) न्यून होतो किंवा संकेतस्थळांना भेट देणार्यांची संख्या उणावते. हे सर्व कोण सहन करणार ? त्यामुळे परिश्रम करणार्यांना झाकले जाते आणि गर्भश्रीमंतांच्या कथा पुढे आणल्या जातात.
माध्यमांनी योग्य-अयोग्य यांचे भान जपत आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्या वृत्ताला किती महत्त्व द्यावे ? हेही लक्षात घ्यावे. सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना त्याविषयीची वृत्ते दाखवली जात नाहीत. उलट प्रसिद्धीच्या हव्यासापायी क्षुल्लक गोष्टींचा गवगवा केला जातो. यातून राष्ट्रहित कसे साधले जाणार ? समाजानेही मनोरंजनात्मक विश्वातून वेळीच बाहेर येऊन वास्तवाचा विचार करावा. दिशाहीन न होण्यासाठी सर्वांनीच भान जोपासून वर्तन करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.