कुर्टी, फोंडा येथे धर्मांधांनी भारताच्या तिरंग्यापेक्षा उंचावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचे प्रकरण !
फोंडा, १६ ऑगस्ट (वार्ता.) – भारताच्या तिरंग्यापेक्षा उंचावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याच्या घटनेचा १६ ऑगस्ट या दिवशी तीव्र शब्दांत निषेध करतांना ‘हे दुष्कृत्य करणार्यांवर देशद्रोहाचा खटला भरावा’, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीने फोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर राज्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सर्वश्री शैलेंद्र वेलींगकर, राजीव झा, नितीन फळदेसाई, जयेश थळी, दत्ता नाईक, विश्वास बाक्रे, आदीश उसगावकर, संदीप पाळणी, विकास महाले, देविदास सराफ आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तिरंगा हा देशाच्या मानसन्मानाचे प्रतीक आहे. सरकार आणि पोलीस यांनी या प्रकरणातील संशयित कयामुद्दीन अली याच्यावर देशद्रोहाचा खटला भरावा. या संशयितांना साहाय्य करणार्यांवरही कारवाई करावी.
फोंडा येथील क्रांती मैदानात सभेच्या माध्यमातून देशद्रोही घटनेचा निषेध
तत्पूर्वी प्रारंभी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीच्या वतीने फोंडा येथील क्रांती मैदानात या देशद्रोही घटनेच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. या सभेला उपस्थित राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संबोधित केले. देशद्रोही कृती करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी उपस्थितांनी केली. ‘राष्ट्रध्वजाचा अवमान सहन करणार नाही’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद !’ अशा घोषणा देण्यात आल्या.
पाकिस्तानचा ध्वज फडकावल्याच्या कारणामुळे सामाजिक माध्यमातून रोष व्यक्त
कुर्टी, फोंडा येथे तिरंग्यापेक्षा उंचावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचे छायाचित्र १५ ऑगस्ट या दिवशी व्हॉटस्ॲप गटांवर प्रसारित झाल्यावर सामाजिक माध्यमांतून याविषयी संताप व्यक्त झाला. हा प्रकार नंतर फोंडा पोलिसांच्या निदर्शनास आणण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी संशयिताच्या घरी जाऊन त्याला खडसावले. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
झिंगडीमळ, कुर्टी येथील अनधिकृत वस्ती हा एक संवेदनशील भाग !
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तो झिंगडीमळ, कुर्टी या भागात सरकारी भूमी बळकावून झोपडपट्टी आणि घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी गोव्याबाहेरील स्थलांतरितांची मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे आणि हा एक धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून ओखळला जातो. तिरंग्याचा अवमान केल्याच्या प्रकरणी कह्यात घेतलेला संशयित कयामुद्दीन अली हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून तो गोव्यात कुर्टी, फोंडा येथे व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास आहे.
तिरंग्याचा अवमान केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट
फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर म्हणाले, ‘‘संबंधित ध्वज हा पाकिस्तानचा ध्वज नाही; मात्र तो पाकिस्तानचा असल्यासारखा वाटतो. संशयितांचे कुटुंबीय संबंधित ध्वज हा धार्मिक ध्वज असल्याचा दावा करत आहेत; मात्र भारताच्या तिरंग्यापेक्षा अधिक उंचीवर दुसरा ध्वज फडकावणे हा गुन्हा आहे.’’ प्राप्त माहितीनुसार तिरंग्याहून अधिक उंचावर संबंधित धार्मिक ध्वज लावण्यात आला होता. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी तिरंग्याचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘राष्ट्रीय सन्मान कायदा, १९७१’चे कलम २ अंतर्गत संशयित कयामुद्दीन अली याच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
संशयित कयामुद्दीन अली याला जामीन संमत
या प्रकरणी कह्यात घेतलेला संशयित कयामुद्दीन अली याला फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने जामीन संमत केला आहे.
फडकावलेला झेंडा पाकिस्तानचा नव्हे, तर धार्मिक झेंडा ! – संशयित कयामुद्दीन अली याचे स्पष्टीकरण
कयामुद्दीन अली याला न्यायालयात उपस्थित केले असता तो म्हणाला, ‘‘पाकिस्तानच्या झेंड्याप्रमाणे दिसणार्या झेंड्याचा पाकिस्तानच्या झेंड्याशी कोणताच संबंध नाही. हा ध्वज धार्मिक आहे. ईदच्या काळात हा ध्वज लावण्यात आला होता. मी कामावर गेलेलो असतांना माझ्या मुलांनी नकळतपणे धार्मिक झेंड्याच्या खालच्या बाजूला तिरंगा फडकावला. मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी तिरंग्याचा सन्मान करतो. माझ्या लहान मुलांनी केलेल्या चुकीबद्दल मी आणि माझे कुटुंबीय सर्वांची क्षमा मागतो.’’