स्वातंत्र्यासाठी भारताबाहेर जाऊन सैन्य उभारण्याचे अद्वितीय कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !

भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस रंगूनमार्गे भारताबाहेर गेले. त्यांनी तेथे जपान आणि जर्मनी या बिटिशांच्या शत्रूदेशांची संपर्क साधला. जपानकडून युद्धात पकडल्या गेलेल्या आणि बिटिशांच्या बाजूने लढणार्‍या सैनिकांच्या तुकडींची नेताजींनी भेट घेतली. त्यांच्यात भारताच्या स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देऊन भारतीय स्वातंत्र्य साध्य होऊ शकते, हे त्यांच्या मनावर बिंबवले आणि असे अनेक सैनिक, सैन्याधिकारी यांना एकत्र करून मोठी सेना निर्माण केली. या सेनेला नेताजींनी ‘आझाद हिंद सेना’, असे नाव दिले. या सैन्याने उत्तरेकडून इंग्रज सैन्यावर आक्रमण करून निकराचा लढा दिला. ‘आझाद हिंद सेना’ शस्त्रसज्ज आणि सामर्थ्यवान इंग्रजांशी मोठ्या शौर्याने लढली; मात्र त्यांना नंतर पराभव पत्करावा लागला. असे असले तरी या सेनेचा धसका इंग्रजांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी भारतातून गाशा गुंडाळला. हातात काही नसतांना वेष पालटत भारताबाहेर जाऊन सैन्य उभारणे, नेतृत्व करणे, इंग्रजांवर आक्रमण करणे, हे किती कठीण काम आहे. यातून नेताजींची असामान्य दूरदृष्टी, नेतृत्व, राष्ट्राभिमान, जिद्द आणि शूरता यांचा परिचय येतो. भारतमातेच्या या पुत्राला शतश: प्रणाम !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.