‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणजे मंकीपॉक्स नव्हे !

वैद्य परीक्षित शेवडे

‘मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य काही शहरांतील लहान मुलांत ‘मंकीपॉक्स’सारखी लक्षणे दिसल्याने पालकांत भीती’, अशा शीर्षकाची बातमी काही ठिकाणी वाचली. यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे –

१. हा मंकीपॉक्स नसून ही ‘हँड, फूट अँड माऊथ’ नामक रोगाची साथ आहे.

२. या रोगात लहान मुलांमध्ये हाता-पायांवर पुरळ, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक असलेले फोड अशी लक्षणे असतात.

३. बहुतेक वेळेला केवळ लाक्षणिक उपाय पुरेसे असतात. वेळेत आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास तोंडात येणारे फोड सहज टाळता येतात.

४. भारतात आढळलेली मंकीपॉक्सची लक्षणे अन्य देशांच्या तुलनेत पुष्कळ सौम्य आहेत.

‘हँड, फूट अँड माऊथ’ या रोगासंबंधी घेण्याची काळजी

१. वरील लक्षणे दिसताच मुलांना शाळेत पाठवणे थांबवावे आणि तातडीने आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. शक्यतो आपल्या पाल्याला रुग्णालयात तपासणीसाठी न नेता लक्षणे आणि भ्रमणभाषवर छायाचित्र घेऊन जाण्यास प्राधान्य द्यावे.

२. घरात एकाहून अधिक मुले असल्यास ज्याला लक्षणे आहेत त्याला अन्य मुलांपासून काही दिवस लांब ठेवावे.

३. साथ ओसरेपर्यंत शाळेत डब्याची वाटावाटी न करण्याविषयी आपल्या मुलांना समजवावे.

४. लक्षणे असतांना (पण ताप नसतांना) अंघोळीच्या पाण्यात कडूनिंबाची पाने घालावीत. एरव्हीही सध्या घरात नियमित धूपन करावे आणि त्यात कडूनिंबाची पाने घालावीत. (धूपन करणे, म्हणजे निखारे करून किंवा देशी गायीच्या शेणाची गोवरी पेटवून तिच्यावर ओवा, धूप यांसारखी औषधे घालून धूर करणे आणि घरात धूप दाखवतो त्याप्रमाणे फिरवणे. – संकलक)

५. सामाजिक संकेतस्थळावरून ही माहिती आपल्या परिचितांपर्यंत पोचवावी आणि यासंबंधी जागरूकता निर्माण करावी. यामुळे अनाठायी भीती निर्माण न होता सजगपणे योग्य ती काळजी घेतली जाईल.

(३.८.२०२२)

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.