पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

प्रतिकात्मक छायाचित्र

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे प्रशासनाच्या आवाहनानुसार नागरिकांनी घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शहापूर खणीत केले. वास्तविक शहापूर खण ही घाण, जलपर्णी आणि रसायनयुक्त पाणी यांनी भरलेली असते; याउलट पंचगंगा नदीचे पाणी हे प्रवाही असते. त्यामुळे नदीच्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जित करणे योग्य आहे. तरी नेहमीप्रमाणे पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जनाला अनुमती द्यावी. यानंतरही पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले.

या प्रसंगी रवि गोंदकर, प्रताप पाटील, शहाजी भोसले, मनोहर जोशी, मोहन मालवणकर, महेश शेंडे उपस्थित होते. (अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ? – संपादक)