नागपूर येथील २०० वर्षे पुरातन शिवमंदिर कोसळले !

५ जण घायाळ

पावसामुळे नागपूर जलमय; पुरातन शिवमंदिर कोसळले

नागपूर – शहरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. ही घटना १० ऑगस्टच्या पहाटे ५ वाजता घडली. यात ५ जण घायाळ झाले असून यामध्ये ५ मासांच्या बाळाचा समावेश आहे. घरांतील ६ जणांना नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढून यातील ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.

नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !

गेले ३ दिवस चालू असलेल्या पावसामुळे शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाने १० ऑगस्ट या दिवशी होणार्‍या तीनही सत्रातील परीक्षा रहित करण्यात आल्याचे घोषित केले आहे. ‘रहित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल’, असेही विद्यापिठाने कळवले आहे, तसेच शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.