सोलापूर येथे शालेय साहित्य वाटपाच्या नावाखाली महापालिका शाळांमध्ये धर्मांतराचे षड्यंत्र !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन देण्यासाठी उपस्थित हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते

सोलापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – शालेय साहित्य वाटपाच्या नावाखाली महापालिका शाळांमध्ये ख्रिस्ती पंथाचा प्रसार करणार्‍या योहान कानेपागुल, ‘ख्रिस्ती समाज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था’ आणि ‘शिवालय आश्रम शाळा’ संबंधित शिक्षणसंस्थेवर कडक कारवाई करावी अन्यथा हिंदु राष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली. या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवि गोणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की,

१. सोलापूर शहरातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. ‘ख्रिस्ती समाज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था’ अशा ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप न करता महापालिकेच्या शाळांमध्ये वाटप करत आहे. साहित्य वाटपाच्या नावाखाली ख्रिस्ती पंथाचा प्रचार आणि धर्मांतर करण्याचे या संस्थेचे षड्यंत्र उघड होत आहे.

२. हिंदूंची मुले शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी जाणूनबुजून लहान मुलांमध्ये येशू, ख्रिस्ती समाज यांविषयी आस्था निर्माण करून धर्मांतर घडवण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात आहे. योहान कानेपागुल ही व्यक्ती सोलापूर महापालिकेचा कर्मचारी असून कामावर कार्यरत असतांना त्याच्याकडून हे षड्यंत्र आखले जात आहे.

३. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही शासकीय कर्मचार्‍याला राजकीय किंवा धार्मिक विषयात हस्तक्षेप करता येत नाही, असे असूनही दत्तू तथा योहान कानेपागुल याच्याकडून अनेक वेळा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

संपादकीय भूमिका

शैक्षणिक संस्थांतून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा छुपा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्त्यांचे आर्थिक स्रोत बंद करायला हवेत !