सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेली १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकभरती !

पुणे – शासन स्तरावर होणार्‍या प्राध्यापक भरतीला दिरंगाई होत असल्याने ५५ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने १३२ प्राध्यापकांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा आर्थिक भार विद्यापिठाला सहन करावा लागणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून विद्यापिठामध्ये प्राध्यापक भरती करण्यात आली नसल्यामुळे ही स्थिती ओढावली आहे. (एक तप होऊनही विद्यापिठामध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती होत नसेल, तर विद्यार्थी कसे घडणार ? शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या शहरातील विद्यापिठाची ही स्थिती, तर इतर ठिकाणी काय असेल ? – संपादक)

शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तरामध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे जाणून १३२ कंत्राटी प्राध्यापकांची भरती ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, तसेच विद्यापीठ निधीतून १४० प्राध्यापकांपैकी किती जागा रिक्त आहेत, त्याचा आढावा घेऊन त्याही जागा सप्टेंबरअखेर भरल्या जातील, असे विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये अनुदानित पदांपैकी ५६ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद केले आहेत. सध्या विद्यापिठामध्ये अनुदानित विभागातील केवळ १४ प्राध्यापक आहेत; तर सहयोगी ३५ आणि साहाय्यक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहेत.

संपादकीय भूमिका

विद्यापिठामध्ये कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती केली जाणे, हे गंभीर आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुरेसे प्राध्यापक असणे आवश्यक आहे. प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवण्यामागील नेमकी कारणे पुढे येणे आवश्यक आहे !