१२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या चिनी भ्रमणभाष संचांवर येणार निर्बंध !

  • १२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या भ्रमणभाष संचांच्या व्यवसायात चिनी आस्थापनांचा तब्बल ८० टक्के वाटा !

  • ‘शाओमी’, ‘विवो’, ‘रेडमी’, ‘रिअलमी’ या चिनी आस्थापनांना बसणार फटका !

नवी देहली – देशातील चिनी भ्रमणभाष आस्थापनांवर निर्बंध घालण्याची सिद्धता चालू आहे. केंद्रशासन लवकरच १२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या चिनी भ्रमणभाष संचांवर भारतात बंदी घालू शकते. ‘ब्लूमबर्ग’ या व्यावसायिक आस्थापने दिलेल्या माहितीनुसार केंद्राने हा निर्णय ‘लाव्हा’ आणि ‘मायक्रोमॅक्स’ यांसारख्या देशांतर्गत आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे. या निर्णयामुळे ‘शाओमी’, ‘विवो’, ‘ओप्पो’, ‘पोको’, ‘रेडमी’, ‘रिअलमी’ या चिनी आस्थापनांना फटका बसणार आहे.

१. ‘स्मार्टफोन’च्या क्षेत्रात भारत ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यावर चिनी आस्थापनांचे वर्चस्व आहे. (हे भारतियांना लज्जास्पद ! – संपादक)

२. एका अहवालानुसार भारतात १५० डॉलर्सपेक्षा (१२ सहस्र रुपयांपेक्षा) अल्प किमतीच्या स्मार्टफोन्सचा वाटा एकूण भ्रमणभाष संचांच्या व्यवसायात एक तृतीयांश आहे. यामध्ये चिनी आस्थापनांचे वर्चस्व असून त्याचे प्रमाण तब्बल ८० टक्के आहे. यामुळे शाओमीला सर्वाधिक फटका बसणार असून त्याचे ६६ टक्के भ्रमणभाष हे १२ सहस्र अथवा त्याखालील किमतीचे आहेत.

३. ‘चिनी भ्रमणभाष संचांवर निर्बंध लादण्यात आले, तर ‘सॅमसंग’ आणि ‘अ‍ॅपल’ या भ्रमणभाष आस्थापनांना त्याचा लाभ होईल’, असे म्हटले जात आहे.

भारताने गेल्या काही कालावधीत चीनवर लादलेले व्यावसायिक निर्बंध !

  • वर्ष २०२० मध्ये सरकारने चीनमधील ६० ‘अ‍ॅप्स’वर बंदी घातली होती. आतापर्यंत एकूण ३४९ चिनी ‘अ‍ॅप्स’वर बंदी घालण्यात आली आहे.
  • भारताने गेल्या काही आठवड्यांत ‘ओप्पो’, ‘विवो’ आणि ‘शाओमी’ या चिनी आस्थापनांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या. ‘विवो मोबाइल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड’ने तब्बल २ सहस्र २१७ कोटी रुपयांची सीमा शुल्क बुडवल्याचा आरोप आहे.

 

संपादकीय भूमिका 

शत्रूराष्ट्राच्या भ्रमणभाष संचांच्या विरोधात भारत शासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. आता राष्ट्रप्रेमींनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे !