जयपूर येथील श्री खाटूश्यामजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू

जयपूर (राजस्थान) – येथील सिकर परिसरातील प्रसिद्ध श्री खाटूश्यामजी मंदिरामध्ये मासिक यात्रेदरम्यान दुर्घटना घडली. ८ ऑगस्टच्या पहाटे मंदिर उघडण्यापूर्वीच भाविकांची पुष्कळ गर्दी झाली होती. पहाटे मंदिर उघडल्यानंतर दर्शनासाठी आत जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू झाला. घायाळ झालेल्या भाविकांवर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या तीनही भाविक महिला आहेत, त्यांपैकी एका महिलेची ओळख पोलिसांनी पटवण्यात आली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

भगवान खाटूश्यामजी हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. चंद्र दिनदर्शिकेनुसार आजचा दिवस श्री खाटूश्यामजी यांच्या दर्शनासाठी शुभ मानला जातो. या मंदिरामध्ये नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन केले जात नसल्यामुळे यात्रांमध्ये अशा दुर्घटना घडतात ! भाविकांना दर्शन सुलभतेने मिळण्यासाठी मंदिर प्रशासनानेच उपाययोजना काढल्यास भाविकांना देवाच्या दारात जीव गमवावा लागणार नाही !