मणीपूर राज्यात आदिवासी संघटनांकडून जाळपोळ आणि तोडफोड !

  • मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन !

  • ५ दिवसांसाठी राज्यातील इंटरनेट सेवा बंद !

इंफाळ (मणीपूर) – येथील स्थानिक आदिवासी विद्यार्थी संघटनांतील युवकांनी सरकारच्या विरोधात हिंसात्मक आंदोलन आरंभले आहे. राज्याच्या बिष्णुपूर जिल्ह्यात ३-४ युवकांनी एका चारचाकी गाडीला आग लावली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने राज्यामध्ये ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद केली असून चुराचांदपूर आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये १४४ कलम अर्थात् जमावबंदी लागू केली आहे. ‘राज्यातील डोंगराळ क्षेत्रांचा विकास होण्यासाठी त्यांना अधिक स्वायत्तता देण्यात यावी’, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. राज्य सरकारने नुकतेच एक विधेयक पारित केले; मात्र या विधेयकात विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांना स्थान न दिल्यामुळे त्यांनी हिंसक आंदोलन आरंभले आहे.

१. आदिवासी संघटनांच्या मागणीवरून २ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ‘मणीपूर (पर्वतीय क्षेत्र) जिल्हा परिषद सहावे आणि सातवे संशोधन विधेयक’ विधानसभेत मांडले.

२. या विधेयकात आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याचे सांगत ‘ऑल ट्राइबल स्टुडंटस यूनियन’कडून राजधानी इंफाळ येथे हिंसाचार करण्यात आला. यावेळी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली.

३. पोलीस आणि विद्यार्थी संघटना यांच्यातील संघर्षात ३० हून अधिक विद्यार्थी घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.

४. या प्रकरणी पोलिसांनी ५ विद्यार्थी नेत्यांना अटक केली. आता या नेत्यांना सोडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

 स्वतःच्या मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन न करता हिंसा करून सामाजिक संपत्तीला हानी पोचवणार्‍यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित !