देहलीतील बाटला हाऊस भागातून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आतंकवाद्यांना करत होता अर्थपुरवठा !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) येथील बाटला हाऊस भागातून मोहसीन अहमद या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक केली. मोहसीन हा अफगाणिस्तान आणि सीरिया या इस्लामी देशांतील त्याच्या म्होरक्यांना भारतातून ‘क्रिप्टो करन्सी’द्वारे (‘आभासी चलना’द्वारे) अर्थपुरवठा करत होता.

यासह तो येथील जामिया मिलिया इस्लामिया विश्‍वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत होता. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीवरूनच मोहसीन याला अटक करण्यात आली. (जर या विद्यार्थ्यांनी माहिती दिली नसतील, तर अन्वेषण यंत्रणांना मोहसीन याच्या कारवायांविषयी काहीच माहिती पडले नसते आणि तो या विद्यार्थ्यांमधून नवीन आतंकवादी सिद्ध करत राहिला असता ! देशात असे आणखी किती मोहसीन असतील, जे पोलिसांना आणि अन्वेषण यंत्रणांना ठाऊक नाहीत, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक)