देहली येथे पतंग उडवण्यावर बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !

पतंग उडवणे, ही सांस्कृतिक कृती असल्याचे न्यायालयाचे मत

देहली – राजधानी देहलीत पतंग उडवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली. ‘पतंग उडवणे, ही सांस्कृतिक कृती आहे’, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. यासह न्यायालयाने ‘पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या चिनी ‘मांजा’च्या विक्रीवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन करावे’, असे निर्देशही राज्य सरकार आणि पोलीस यांना दिले.

मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रह्मण्यम् प्रसाद यांच्या खंडपिठाने म्हटले की, राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वीच चिनी सिंथेटिक ‘मांजा’च्या वापरावर बंदी घातली आहे. देहली पोलिसांनीही याविषयी अधिसूचना काढली आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवरही कारवाई केली जाते. ‘पतंग उडवण्यावर बंदी घालू शकत नाही; कारण ती सांस्कृतिक कृती आहे, तसेच काही ठिकाणी याकडे ‘धार्मिक कृती’ म्हणूनही पाहिले जाते’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.