‘एम्स परिवारा’च्या वतीने वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्काराने डॉ. जगन्नाथ पाटील सन्मानित !

पुरस्कार स्वीकारतांना (मध्यभागी) डॉ. जगन्नाथ पाटील

लातूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘एम्स परिवारा’च्या वतीने सारनाथ, वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांना देण्यात आला. श्रीमान इंद्रेशकुमारजी आणि केंद्रीय तिब्बत विद्यापिठाचे कुलपती डॉ. गेशे समतेनजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, एस्.एस्.सी., एच्.एस्.सी. बोर्डाचे विभागीय मंडळ सदस्य, शिक्षणतज्ञ या संवर्गातील सदस्य म्हणून राज्य मंडळ सदस्य, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अधिसभेवर डॉ. पाटील यांनी कार्य केले आहे. ‘शिक्षणवाट’ या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

त्यांचे शिक्षणविषयक लेख महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले आहेत. विविध सामाजिक विषयांवर त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गुटखा बंदीसाठी कायदा बनवावा, यासाठी तसेच अन्य सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे जनहित याचिका प्रविष्ट केल्या आहेत. संतपीठ त्वरित चालू करण्यासाठी न्यायालयातून याचिकेद्वारे त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.