उत्तरप्रदेश आणि आसाम सीमेजवळ मुसलमानांच्या लोकसंख्येत ३२ टक्क्यांनी वाढ

  • वाढ होण्यामागे घुसखोरांचाही सहभाग  

  • सीमा सुरक्षा दलाचे क्षेत्र १०० किमीपर्यंत वाढवण्याची मागणी

नवी देहली – ग्रामपंचायतींच्या ताज्या नोंदींच्या आधारे उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांच्या पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला स्वतंत्र अहवाल पाठवले आहेत. दोन्ही अहवालांनुसार वर्ष २०११ पासून या राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे, तर देशभरात १० ते १५ टक्क्यांमध्ये पालट झाला आहे. याचाच अर्थ मुसलमानांच्या लोकसंख्येत सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा २० टक्के वाढ झाली आहे. पोलिसांनी हा पालट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ५० कि.मी.वरून १०० कि.मी.पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे; म्हणजेच सीमेच्या मागे १०० कि.मी.पर्यंत अन्वेषण आणि शोध घेण्याचा अधिकार सीमा सुरक्षा दलाला असतील.

१. गुजरात वगळून इतर सीमावर्ती राज्ये पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान, आसाम, बंगाल,  आणि पूर्व अन् उत्तरेकडील राज्यांमधील सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र १५ कि.मी.पर्यंत मर्यादित केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये तपासणी केल्यानंतर ते क्षेत्र ५० कि.मी.पर्यंत वाढवले आहे. काही राज्यांनी यावर आक्षेपही घेतला होता.

२. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, लोकसंख्येतील एवढा मोठा पालट हे केवळ लोकसंख्यावाढीचे सूत्र नाही. भारतातील घुसखोरीची ही नवी रचना असू शकते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे भान ठेवून आतापासूनच अधिक सिद्धता  करावी लागणार आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांच्या अहवालातील माहिती

अ. उत्तरप्रदेशच्या नेपाळ सीमेला लागून असलेल्या पिलीभीत, खेरी, महाराजगंज, बलरामपूर आणि बहराईच या ५ जिल्ह्यांमध्ये वर्ष २०११ च्या राष्ट्रीय सरासरी अंदाजापेक्षा मुसलमानांच्या लोकसंख्येत २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

आ. या ५ जिल्ह्यांमध्ये १ सहस्रांहून अधिक गावे स्थायिक आहेत. यांपैकी ११६ गावांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या आता ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकूण ३०३ गावे आहेत, जेथे मुसलमानांची लोकसंख्या ३० ते ५० टक्के आहे.

इ. एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ पर्यंत या जिल्ह्यांमध्ये मशीद आणि मदरसा यांची संख्या २५ टक्के वाढली. वर्ष २०१८ मध्ये या जिल्ह्यांमध्ये एकूण १ सहस्र ३४९ मशिदी आणि मदरसे होते. त्यांची संख्या आता १ सहस्र ६८८ झाली आहे.

ई. ‘सीमावर्ती भागात बर्‍याच दिवसांपासून घुसखोरी चालू असून बाहेरून येणारे बहुतांश लोक मुसलमान आहेत’, असे गुप्तचरांचे अहवाल वेळोवेळी प्राप्त झाले आहेत.

आसामची स्थिती

बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील धुबरी, करीमगंज, दक्षिण सलमारा आणि काछरा जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३२ टक्क्यांनी वाढली. वर्ष २०११ च्या जनगणनेच्या राष्ट्रीय सरासरी अंदाजानुसार लोकसंख्येमध्ये १२.५ टक्के वाढ व्हायला हवी होती.

संपादकीय भूमिका

इतक्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? आतातरी त्यावर नियंत्रण मिळवून देशाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे का ?