पंतप्रधान मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचे देहलीत महागाईच्या विरोधात आंदोलन

प्रल्हाद मोदी (डावीकडे ) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’ या संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले. या वेळी या संघटनेचे इतरही सदस्य उपस्थित होते.

१. प्रल्हाद मोदी म्हणाले की, ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’चे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करणार आहे. त्यात आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची सूची आहे. वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत आमच्या वाट्यामध्ये केवळ २० पैसे प्रति किलो वाढ करणे, ही क्रूर चेष्टा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, त्यांनी आम्हाला दिलासा द्यावा आणि आमची आर्थिक दुर्दशा थांबवावी.

२. केंद्र सरकारने तांदूळ, गहू आणि साखर यांच्यासाठी हानीभरपाई द्यावी. खाद्यतेल आणि डाळी यांचे वाटप रास्त भाव दुकानांमधून करावे, तसेच विनामूल्य अन्नधान्य वितरणासाठी ‘पश्‍चिम बंगाल रेशन मॉडेल’ देशभरात लागू करावे, अशा मागण्याही या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.