जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

प्रतिकात्मक छायाचित्र

जामखेड (नगर) – तालुक्यातील ४० टक्के शाळेच्या इमारती नव्याने उभारण्याची आवश्यकता असून निर्लेखन (कालबाह्य झालेल्या खोल्या, उपकरणे आदींची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकार्‍यांनी काढावयाचे आदेश) झालेल्या आणि निर्लेखनास संमती मिळालेल्या २७९ शाळा आहेत; मात्र विद्यार्थ्यांना बैठकीसाठी अन्य सुविधा नसल्याने या वर्ग खोल्यांमधूनच शाळा भरते. शासनाने ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि विनामूल्य केले आहे; मात्र शाळेत भौतिक सुविधांची वानवा आहे. जिल्ह्यातील १७७ शाळांमध्ये ५९२ वर्ग खोल्या अस्तित्वात आहेत. त्यांपैकी ६७ शाळांतील १७७ वर्ग खोल्यांच्या निर्लेखनाला संमती मिळाली आहे; तर ३५ शाळांमधील १०२ वर्ग खोल्या निर्लेखन आणि संमती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला असला, तरी भौतिक सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यांमध्ये शाळेच्या खोल्यांची मागणी अधिक आहे; मात्र प्रतिवर्षी १०-१२ खोल्यांना संमती मिळते. त्यामुळे हा अनुशेष भरून काढणे मोठे आव्हान असून यासाठी धोरणात्मक पालटाची आवश्यकता आहे, असे मत जामखेड येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.

संपादकीय भूमिका

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !