बालसाधकांप्रमाणे निरागस होऊन त्यांना आनंद अनुभवायला देणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

आम्ही (मी, आई (सौ. स्वाती), बाबा (श्री. सुनील) आणि बहीण (कु. स्नेहल)) सोलापूर सेवाकेंद्रात असतांना फेब्रुवारी २०२१ मध्ये आम्हाला सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगात अनुभवायला मिळालेले आनंदाचे क्षणमोती पुढे दिले आहेत.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत जाते (धान्य दळायचे) फिरवतांना ‘गुरुदेव सामूहिक आनंद देत आहेत’, असे जाणवणे आणि गोपी जशा श्रीकृष्णाच्या बासरीच्या मधुर नादात स्वतःला विसरून जायच्या, त्याप्रमाणेच नकळत त्या आनंदात हरवून जाणे

कु. सानिका सोनीकर

एकदा मी प्रथमच जात्यावर धान्य दळायला शिकत होते. तेव्हा सद्गुरु स्वाती खाडये माझ्या समवेत धान्य दळायला बसल्या होत्या. (‘यावरून लक्षात येईल की, सनातनचे संत इतर संतांपेक्षा किती निराळे आहेत ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ) तेथे अन्य साधिकाही होत्या. त्या वेळी ‘प्रत्यक्ष गुरुदेव आमच्या समवेत जाते फिरवत असून त्यांनाही आनंद झाला आहे’, असे मला जाणवले. गोपी जशा श्रीकृष्णाच्या बासरीच्या मधुर नादात स्वतःला विसरून जायच्या, त्याप्रमाणेच मी नकळत त्या आनंदात स्वतःला विसरून गेले होते.

२. साधिकेने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र सद्गुरु स्वातीतार्ईंना  दाखवल्यावर त्यांना ते आवडणे

एकदा मी बालसाधकांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी हे चित्र सद्गुरु स्वातीताईंना दाखवले, तर त्यांना आवडेल का ?’ मी ते चित्र सद्गुरु स्वातीताईंना दाखवल्यावर त्यांना ते चित्र आवडले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. मला आणखी चित्रे रेखाटायला प्रोत्साहन मिळाले.

३. सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन उत्साह जाणवणे

पूर्वी सेवा करतांना माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार यायचे; परंतु सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगामुळे मला नकारात्मक स्थितीतून बाहेर पडता आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला वेगळा उत्साह जाणवत होता.

४. सद्गुरु स्वातीताईंच्या सहवासात शक्ती मिळणे

मी सोलापूरहून गोवा येथे येत असतांना सद्गुरु स्वातीताईंनी मला कुशीत घेतले. त्या वेळी ‘त्यांच्या कुशीतच रहावे’, असे मला वाटत होते. ‘त्यांच्या सहवासात असतांना शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले.

– कु. सानिका सोनीकर (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक