काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे स्थानांतरासाठी अद्यापही आंदोलन चालूच !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – विविध सरकारी प्रयत्नानंतरही हिंदु कर्मचारी काश्मीर खोर्‍यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे खोर्‍यातून बाहेर देशात अन्यत्र कुठेही स्थानांतर होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असे या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या ‘ऑल मायग्रेंट (निर्वासित) कर्मचारी संघ काश्मीर’ने सांगितले. येथे १२ मेपासून सलग आंदोलन चालू आहे.

गेल्या काही मासांपासून काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून त्यांना ठार मारण्यात येत असल्यामुळे येथील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांनी त्यांचे स्थानांतर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत.

आता केंद्रीय गृह मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५ कनिष्ठ अभियंत्यांचे काश्मीरमधून जम्मू विभागात स्थानांतर करण्याचा आदेश काढला आहे. हे सर्वजण काश्मिरी हिंदू आहेत. याआधी केंद्र सरकारने स्पष्ट केले होते, ‘कोणत्याही हिंदु कर्मचार्‍याची हिंसाचाराच्या भीतीमुळे काश्मीरमधून स्थानांतर केले जाणार नाही.’ आता अचानक केलेल्या स्थानांतराविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने कुठलाही खुलासा केलेला नाही.   तरीही आंदोलन करणार्‍या ५ सहस्र काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांनी स्थानांतराच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे; मात्र ‘सर्व काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांना खोर्‍यातून बाहेर सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित केले जात नाही, तोवर आंदोलन संपणार नाही’, अशी त्यांची भूमिका आहे.

केंद्र सरकारने काश्मीरमध्ये नियुक्त मूळ जम्मूतील हिंदु कर्मचार्‍यांच्या (काश्मिरी हिंदू नसलेल्या) स्थानांतरावर निर्णय घेण्याआधी समितीची स्थापना केली आहे. मुख्य सचिव (कार्मिक विभाग) मनोजकुमार द्विवेदी हे या समितीचे प्रमुख आहेत. ही समिती स्थानांतराशी संबंधित सर्व पैलूंची पडताळणी करेल; मात्र काश्मिरी हिंदूंच्या स्थानांतराची शिफारस करणार नाही. या कर्मचार्‍यांच्या स्थानांतराशी संबंधित कोणताही निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संमतीखेरीज होऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका 

स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !