२३ ऑगस्ट या दिवशी सुनावणी
मुंबई – औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे; मात्र दोन्ही याचिकांवर न्यायालयाने १ ऑगस्ट या दिवशी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सुनावणी २३ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सरकारचा निर्णय राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचा आणि समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकांवर १ ऑगस्ट या दिवशी किंवा याच आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.