|
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता केवळ ७/१२ संगणकीकृत करण्याच्या नावाखाली एका ७/१२ वरील कायम कुळाचे नाव आणि ‘घरपरसू’ (घराच्या बाजूचा परिसर) टिप्पणी (शेरा) काढल्याचा प्रकार वेंगुर्ला शहर तलाठी कार्यालयाकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ‘याविषयी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहे’, असे राजन सातार्डेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
‘संबंधित भूमी वेंगुर्ला शहरातील रामेश्वर मंदिराच्या जवळ असून तिचा भू मापन क्रमांक आणि उपविभाग ६४१/१०/०५ या ७/१२ मध्ये कायम कूळ म्हणून यशवंत गजानन पंडित यांच्या नावाची नोंद होती; परंतु ७/१२ संगणकीकृत करतांना संबंधित व्यक्तीने संगनमत करून ७/१२ वरील कायम कुळाचे नाव आणि ‘घरपरसू’ टीप्पणीही काढली. कायम कूळ यशवंत गजानन पंडित यांचा कायदेशीर कारभार मी पहात असल्याने ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यामुळे मी त्या भूमीचा तात्काळ नवीन ७/१२ उतारा काढला. त्या ७/१२ वरील नोंदीतून वरील प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित तलाठ्यांशी वेळोवेळी भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते भेटले नाहीत. त्यामुळे या अनुषंगाने अनेकांच्या संदर्भात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. हा प्रकार अतिशय घातक आणि गंभीर असून महसूल खात्याकडून ७/१२ संगणकीकृत करण्याच्या नावाखाली अशा प्रकारे नावे परस्पर काढून टाकली जात असतील, तर हा मोठा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींनी वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता आहे. या प्रकाराची गंभीर नोंद तहसीलदारांनी घ्यावी’, असे सातार्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकामनमानी कारभार करणार्या तलाठी कार्यालयातील कर्मचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |