देवाने आपल्याला स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन पहाण्याचे मोठे भाग्य दिले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. आपण सर्व जण या अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. देवाने आपल्याला मोठे भाग्य दिले आहे. जर आपण गुलामगिरीच्या काळात जन्माला आलो असतो, तर ‘आपल्यासाठी हा दिवस कसा असता ?’, याची कल्पना करणेही कठीण आहे. ‘त्या काळी स्वातंत्र्याच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी किती मोठी अस्वस्थता असेल’, याचा विचार करा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या ९१ व्या कार्यक्रमामध्ये ३१ जुलैच्या रविवारी केले. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदाच्या १५ ऑगस्टला या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप येत आहे. मेघालयात हुतात्मा टिरोट सिंह यांनी खासी डोंगरांवरील ब्रिटिशांच्या नियंत्रणाला कडाडून विरोध केला होता. या चळवळीला त्यांनी नाटकाद्वारे मांडले आणि इतिहास जिवंत केला. कर्नाटकात वैशिष्ट्यपूर्ण मोहीम राबवण्यात आली. ७५ ठिकाणी भव्य कार्यक्रम झाले. या वेळी कर्नाटकच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘आझादी की रेल गाडी’ कार्यक्रम !

या मासात ‘आझादी की रेल गाडी’ नावाचा नूतन उपक्रम चालू करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीतील रेल्वेची भूमिका लोकांना कळली पाहिजे, हा यामागचा उद्देश ! झारखंडचे गोमो जंक्शन हे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन’ म्हणून ओळखले जाते. या स्थानकावर ‘कालका मेल’मध्ये चढून ब्रिटीश अधिकार्‍यांना चकमा देण्यात नेताजींना यश आले. लक्ष्मणपुरी (लखनौ) जवळील ‘काकोरी’चे नावही तुम्ही ऐकले असेल. रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकुल्लाह खान आदी शूरवीरांची नावे याच्याशी जोडलेली आहेत. देशभरातील २४ राज्यांतील ७५ रेल्वे स्थानकांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आहे. त्यांची सजावट केली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी राष्ट्राला केलेल्या संबोधनात दिली.
‘तुम्हीही वेळ काढून अशा जवळच्या ऐतिहासिक स्थानकांना भेट द्यावी. तुम्हाला तो इतिहास कळेल. शाळकरी मुलांना अशा स्थानकांवर नेले पाहिजे’, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले.

स्वतःच्या घरी तिरंगा फडकवा ! – पंतप्रधान

‘१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या घरी तिरंगा फडकवा ! तिरंगा आपल्याला एकत्रित आणतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. २ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाची रचना करणार्‍या पिंगली व्यंकय्या यांची जयंती आहे. महान क्रांतीकारक मॅडम कामा यांनी राष्ट्रध्वजाला आकार दिला’, असेही पंतप्रधान म्हणाले.