बागेश्वर (उत्तराखंड) येथे अचानक रडू आणि किंचाळू लागले शाळेतील विद्यार्थी !

विचित्र हावभाव करण्यास आरंभ केलेल्या विद्यार्थिनीने नातेवाइकाचे झाडाला लटकलेले शव काही दिवस आधी पाहिले होते !

बागेश्वर (उत्तराखंड) येथे अचानक रडू आणि किंचाळू लागले शाळेतील विद्यार्थी

बागेश्वर (उत्तराखंड) – बागेश्वर जिल्ह्यातील रैखोली गावात असलेल्या ‘राजकीय ज्युनियर हायस्कूल’मध्ये २६ जुलै या दिवशी एक विचित्र घटना घडली. येथे आठवी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अचानक किंचाळायला अन् रडायला लागले. आवाज ऐकून शिक्षक आणि गावातील लोक तेथे जमले. ही घटना भूत-प्रेत यांच्याशी संबंधित असल्याची लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. सरकारकडून यासंदर्भात विद्यार्थ्यांवर उपचार करण्याची व्यवस्था केली जात आहे.

१. या घटनेमागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे. आठवी इयत्तेतील सर्वांचे नेतृत्व करणार्‍या एका विद्यार्थिनीने तिच्या एका वृद्ध नातेवाइकाचे शव काही दिवसांपूर्वी एका झाडाला लटकलेल्या स्थितीत पाहिले होते. त्याचा परिणाम तिच्या मनावर झाल्याने ती अशा प्रकारे मध्येच मोठमोठ्यांदा किंचाळायची आणि रडायची.

२. २६ जुलै या दिवशी ती वर्गात अशा प्रकारे रडू लागली. ते पाहून अन्य विद्यार्थीही रडू आणि किंचाळू लागले.

३. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष पोखरिया यांनी या घटनेला ‘मास हिस्टीरिया’चा प्रकार असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ एका व्यक्तीने अमुक प्रकारे हावभाव करायला आरंभ केला, तर त्या गटातील अन्य व्यक्तींचे मनही त्याकडे ओढले जाते अन् मन त्यांच्या शरिराला तसे हावभाव करण्यास प्रवृत्त करते.

४. ‘अशा प्रकारच्या घटना याआधी राज्यातील चामोली, अल्मोडा, पिथोरागड येथेही घडल्या आहेत’, अशी माहिती मुख्य शिक्षणाधिकारी डॉ. पवन शर्मा यांनी दिली.

संपादकीय भूमिका

याची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी न करता याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे अशा त्रासांपासून रक्षण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !