महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या उपाहारगृहाच्या मालकाने ‘केवळ एम्.आय.टी.च्या विद्यार्थ्यांसाठी, तळीलँडमध्ये स्वागत, ७९९ रुपयांमध्ये २ घंट्यांत अमर्यादित प्या’, अशा प्रकारे लिखाण असलेला विज्ञापनाचा एक फ्लेक्स लावला होता. अशा प्रकारच्या लिखाणाचा फ्लेक्स लावण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी ‘एम्.आय.टी. कॉलेजचे विद्यार्थी उपाहारगृहाकडे आकर्षित होऊन व्यवसायाची विक्री वाढावी, यासाठी तो लावलेला आहे’, असे सांगितले. ‘याद्वारे आपण विद्यार्थ्यांना मद्य पिण्यास प्रवृत्त करत आहोत, याचे भान उपाहारगृह मालकांना नाही’, असे आपण म्हणू शकतो. व्यवसायासाठी विज्ञापन करणे आणि मद्य पिण्यास प्रवृत्त करणे यांमध्ये भेद आहे.
केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते. शैक्षणिक संस्थांच्या जवळ मद्य विक्रीसाठी अनुमती देणे, हेच मुळात अवैध आहे. याचे अनुकरण इतर उपाहारगृह मालकांनी केल्यास याचे परिणाम किती घातक होतील, याचा विचार कोण करणार ? तसेच युवा पिढी नशेच्या अधीन होऊन विकृत झाल्यास याचेही दायित्व कोण घेणार ? सध्या तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा प्रकारे तरुणांना मद्य पिण्यास प्रोत्साहित करणे, म्हणजे त्यांना विनाशाच्या खाईत लोटण्यासारखेच आहे ! आज अल्पवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून तिचे मुख्य कारण व्यसन हेही आहे. अशा विज्ञापनांमुळे तरुणाई पुढे काय करेल ? याचा विचारच न केलेला बरा ! यासाठी समाजमनावर योग्य संस्कार असणे आवश्यक आहे. समाजाला धर्मशिक्षण दिल्यास योग्य-अयोग्य समजेल.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजाची अधोगती होत आहे. त्यामुळेच आज समाजमन सुसंस्कारित करणे आवश्यक आहे. समाजाला धर्मशिक्षण दिल्यास स्वार्थासाठी कोणत्याही प्रकारची विज्ञापने करण्याची कुणाची बुद्धी होणार नाही. या उदाहरणातून बोध घेऊन सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला धर्मशिक्षण देण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, हीच जागृत नागरिकांची मागणी ! हिंदु राष्ट्रात मद्याला प्रोत्साहन देणारे स्वार्थी व्यावसायिक आणि मद्याच्या आहारी जाणारे तरुण नसतील, तर साधनेमुळे नीतीमान झालेले राष्ट्र अन् धर्म प्रेमी युवक असतील !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे