केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरील ट्वीट काढून टाका ! – देहली उच्च न्यायालयाचा काँग्रेसच्या नेत्यांना आदेश

गोव्यातील एका रेस्टॉरंटचे प्रकरण

नवी देहली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी यांच्यावर गोव्यातील एका रेस्टॉरंटच्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून देहली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांना फटकारत त्यांना या संदर्भातील ट्वीट २४ घंट्यांत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. हे रेस्टॉरंट स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचे असून यामध्ये अवैधरित्या मद्यालय चालवले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. स्मृती इराणी यांनी हा आरोप फेटाळून लावत काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट केला आहे. न्यायालयाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा या यांना समन्स बजावत त्यांना १८ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत. ‘जर काँग्रेसच्या नेत्यांनी ट्वीट काढून टाकले नाही, तर ट्विटरला ते काढावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.