मंगळुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून मुसलमान तरुणाची हत्या !

  • सुरतकल भागात जमावबंदी

  • घरातच नमाजपठण करण्याची पोलिसांची मुसलमानांना विनंती

मंगळुरू (कर्नाटक) – येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्‍यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली. यानंतर पोलिसांनी येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन्. शशी कुमार यांनी दिली. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी मुसलमानांना घरामध्ये नमाजपठण करण्याची विनंती केली आहे. ‘याप्रकरणी लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कर्नाटकमध्ये गेल्या ३ दिवसांत २ मुसलमान, तर एका हिंदूची हत्या झाली आहे.
मारेकर्‍यांनी हत्या करतांना चेहर्‍यावर मास्क लावला होता. मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले होते. फाजील येथे कपड्यांच्या दुकानाबाहेर ओळखीच्या व्यक्तीसमवेत बोलत असतांना त्याच्यावर आक्रमण करण्यात आले. यात तो घायाळ झाल्यावर त्याला रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. ‘फाजील हा पोलिसांचा खबरी (पोलिसांना माहिती पुरवणारा) होता’, असे सांगितले जात आहे.

प्रवीण नेट्टारू यांच्या कुटुंबियांना कर्नाटक सरकारकडून ५ लाख, तर भाजपकडून २५ लाख रुपये हानीभरपाई !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दक्षिण कन्नड येथे धर्मांधांकडून हत्या करण्यात आलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना हानी भरपाई म्हणून सरकारकडून ५ लाख रुपये, तर भाजपकडून २५ लाख रुपये दिले.