(‘दारुल इस्लाम’ म्हणजे ज्या देशात मुसलमानांचे शासन आणि शरिया कायदा सर्वांना लागू होतो, त्याला ‘दारुल इस्लाम’ म्हणतात.)
नवी देहली – हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत. ‘दारूल इस्लाम’ही आहे, हिंदुत्वही आहे आणि ख्रिस्त्यांचा वेगळा मार्गही आहे, असे होऊ शकत नाही, असे विधान भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका मुलाखतीत केले.
डॉ. स्वामी यांनी मांडलेली काही सूत्रे
नूपुर शर्मा मोठा विषय नाही !
डॉ. स्वामी म्हणाले की, आम्ही कुणाला अडवणार नाही; मात्र आमच्या ईश्वराची निंदा करू नका. आम्ही तुमच्या ईश्वराची निंदा करणार नाही. कुणावर आक्रमण केले किंवा हिंसाचार केला, तर ते अवैध आहे. नूपुर शर्मा कुणाला आवडतील आणि कुणाला आवडणार नाहीत. हा काही मोठा विषय नाही. लोकशाहीत टीकेला स्थान असते. तो लोकशाहीचा भाग आहे; मात्र ‘गळा कापून टाकेन’, वगैरे धमक्या मान्य करता येणार नाहीत. कुणी तलवार काढत असेल किंवा हिंसाचार करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सूड उगवणे हा शेवटचा पर्याय असतो. तो वापरला जाऊ नये.
हिंदूंची ४० सहस्र मंदिरे पाडली गेली !
मुसलमान आक्रमकांकडून हिंदूंची ४० सहस्रांपेक्षा अधिक मंदिरे पाडली गेली आहेत. जेथे काही पर्याय नाही तेथे मंदिरे पुन्हा उभारली जावीत, अशी आमची मागणी आहे. प्रभु श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला होता, त्यामुळे त्यांचे मंदिर अयोध्येतच होणार. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता, त्यामुळे त्यांचे मंदिर मथुरेतच झाले पाहिजे. काशी विश्वनाथाचा विषयही तसाच आहे. त्यांना अन्य कुठे नेले जाऊ शकत नाही. ते तेथेच रहातील. अयोध्या, काशी आणि मथुरा यांना कोणताही पर्याय नाही.