वाढते प्रदूषण, तसेच हवामानातील चढउतारांमुळे पालट झाल्याचे तज्ञांचे मत
मुंबई – अरबी समुद्रात असणार्या दाट धुक्यामुळे मासे १८० ते २०० किमी लांब समुद्रात गेले आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करणार्यांना मासेमारीसाठी २०० किमी दूर समुद्रात जावे लागत आहे. त्यामुळे मासेमारी करणार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवामानातील चढउतारांमुळे हे सर्व पालट झाले आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबई शहरात प्रदूषण तर आहेच; पण शहरी भागातून समुद्राच्या दिशेने वहात असलेल्या वार्यांमुळे ते पाण्याच्या दिशेनेही सरकले आहे.
१. हवामानातील सतत होणार्या चढउतारांमुळे माशांचा मार्गात मोठे पालट झाले आहेत. ‘बाँबे डक’ नावाचे मासे वर्सोवा समुद्राच्या किनार्यावर मिळत असत. आता ते पालघरच्या पुढे गुजरात जवळ मिळतात. कोकणातील समुद्रात आढळणारे सारडाइन मासे आता मुंबईच्या समुद्रात आढळतात.
२. हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, पूर्वेकडून येणार्या हवेमुळे मुंबई पासून समुद्रात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्रात धुके ४० ते ५० मैल (नॉटीकल मील) पसरले आहे. ज्यामुळे समुद्रातील नौकांची दृश्यमानता अल्प होते.
३. मासेमारांनी सांगितले की, या दाट धुक्यामुळे बोटींचे अपघातही होतात. समुद्रात दूरवर गेल्यामुळे इंधनाचा, शीतकरणासाठी लागणारे बर्फ, तसेच खाण्यापिण्याच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे माशांच्या किमतीतही वाढ होते.