पुणे – उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे होणार्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (‘आय.आर्.सी.टी.सी.’कडून) ‘भारत गौरव’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील भाविकांसाठी १५ जानेवारीला पुणे स्थानकावरून रात्री १० वाजता ही विशेष रेल्वे उत्तरप्रदेशकडे रवाना होणार आहे. केंद्रशासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारत गौरव’ ही विशेष रेल्वे सेवा चालू करण्यात आली आहे, असे आय.आर्.सी.टी.सी. पुणे विभागाचे व्यवस्थापक सुभाष नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गुरुराज सोन्ना उपस्थित होते.
‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या या सेवेद्वारे देशभरातून वर्षभरात आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या विविध मार्गांवरून धावल्या आहेत. विशेषतः धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेकांना देशातील पर्यटनासह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेता आले आहे. नववर्षाच्या आरंभीला उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभमेळा पर्व चालू होत आहे. त्यानिमित्त पुणे तसेच इतर जिल्ह्यांतील, ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने विशेष रेल्वे गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.