Subsidised Ration During Mahakumbh : आखाडे आणि कल्पवासी यांना सरकारकडून मिळणार स्वस्त धान्य !

गॅस सिलिंडरही मिळणार

(कल्पवासी म्हणजे प्रयागराज महाकुंभात महिनाभर संगमावर स्नान करून, तटावर साधना-उपासना करणारे, तसेच संत-महंतांच्या प्रवचनांचे श्रवण करणारे)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आखाडा आणि कल्पवासी यांना सरकारकडून ६ रुपये प्रतिकिलो तांदूळ, ५ रुपये प्रतिकिलो गव्हाचे पीठ, १८ रुपये प्रतिकिलो साखर आदी मिळणार आहे. यासाठी सरकारने कुंभक्षेत्री १३८ दुकाने निश्‍चित केली आहेत. अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी सरकारने ५ मोठे गोदामही उभारले आहेत. या गोदामांत सहस्रो किलो धान्य ठेवण्याची व्यवस्था आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे.

यासह मुख्यमंत्र्यांनी भाविकांच्या भोजनासाठी अन्नछत्र चालू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आखाडे, कल्पवासी आणि संस्था यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सर्व २५ सेक्टर्समध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे गॅस सिलिंडर संपल्यानंतर त्यांना ते पुन्हा भरून देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.