इराकमध्ये संसदेत घुसून सहस्रो आंदोलकांचा गोंधळ

पंतप्रधान म्हणून इराण समर्थक व्यक्तीच्या नावाला विरोध

बगदाद (इराक) – इराकमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इराण समर्थक व्यक्तीचे नाव घोषित केल्याच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. सहस्रो आंदोलकांनी २७ जुलैच्या रात्री इराकच्या संसदेत घुसून इराकी झेंडे फडकवत गोंधळ घातला. आंदोलकांना संसदेत घुसण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवार्‍याचा आणि सिमेंटच्या अडथळ्यांचा वापर केला; मात्र पोलिसांना बगल देत आंदोलक संसदेत घुसले. इराणचा पाठिंबा असलेल्या पक्षांनी महंमद अल् सुदानी यांना पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केले आहे. देशातील मौलवी आणि त्यांचे समर्थक याला विरोध करत आहेत. तेव्हापासून इराकमधील राजकीय परिस्थिती बिघडली आहे. आंदोलकांचा नेता मौलवी मुक्तदा सद्र आहे. तो मूळचा शियापंथीय आहे. इराकमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणुका झाल्या.

विदेशी दूतावासांना धमक्या

संसदेच्या परिसरात सर्व देशांचे दूतावासही आहेत. आंदोलक येथपर्यंत पोचले, तर पोलीस आणि सैन्य यांच्यासमोर गोळीबार करण्याखेरीज दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. काळजीवाहू पंतप्रधान मुस्तफा अल् कादिमी यांनी आंदोलकांना ‘आपण शांततेतही बोलू शकतो. तुम्ही संसद परिसराच्या बाहेर जा. हे देशासाठी धोकादायक ठरू शकते’, असे आवाहन केले आहे.