आझमगडच्या कारागृहात बंदीवानांना भ्रमणभाष संच आणि गांजा पुरवला : कारागृह अधीक्षकांसह ४ जण निलंबित

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथील कारागृहात बंदीवानांना भ्रमणभाष संच, दूरचित्रवाणी संच आणि गांजा पोचवल्याच्या प्रकरणी कारागृह अधीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. रवींद्र सरोज, श्रीधर यादव, अजय वर्मा आणि आशुतोष सिंह अशी त्यांची नावे आहेत.
कारागृहाचे महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की, २६ जुलैला आझमगडचे जिल्हाधिकारी विशाल भारद्वाज आणि पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी कारागृहामध्ये धाड टाकली. त्या वेळी तेथील बंदीवानांच्या बॅरकमध्ये १२ भ्रमणभाष संच, ‘चार्जर’ आणि अन्य काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. या संदर्भात कारागृहाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्टाचार्‍यांना कामावरून काढून टाकून त्यांना याच कारागृहात शिक्षा भोगायला टाकले पाहिजे ! अशांमुळेच गुन्हेगारांना शिक्षा ही ‘शिक्षा’ वाटत नाही ! अशी स्थिती उणे-अधिक प्रमाणात देशातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये असणार, यात शंका नाही !