दोघा पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून भारतीय सैनिकाने त्यांना दिली गोपनीय माहिती !

प्रतीकात्मक छायाचित्र

जयपूर (राजस्थान) – पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणी शांतीमोय राणा नावाच्या एका भारतीय सैनिकाला येथून अटक करण्यात आली. राणा २ पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सैन्याने या सैनिकावर लक्ष्य ठेवले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राणा पाकच्या गुप्तचर यंत्रणांना भारतीय सैन्याची महत्त्वाची माहिती पुरवत होता. ही माहिती पुरवल्यानंतर त्याच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. शांतीमोय राणा बंगालच्या बांकुडा जिल्ह्यातील कंचनपूर गावचा रहिवासी आहे. मार्च २०१८ मध्ये तो सैन्यात भरती झाला होता.

गेल्या काही मासांपासून राणा सामाजिक माध्यमांद्वारे या दोन तरुणींच्या संपर्कात होता. दोन्ही तरुणींनी राणा याला खोट्या नावाने जाळ्यात ओढले. मैत्री करतांना त्यांनी त्या ‘उत्तरप्रदेशच्या रहिवाशी असून सैन्यात कार्यरत आहेत’, असे खोटे सांगितले. एका तरुणीने तिचे नाव गुरनूर गौर उपाख्य अंकिता असे सांगितले, तर दुसरीने तिचे नाव निशा सांगितले. राणाशी मैत्री झाल्यानंतर दोन्ही तरुणींनी त्याला पैशांचे आमीष दाखवून भारतीय सैन्याची माहिती मागितली. सैन्याचे गोपनीय कागदपत्रांची छायाचित्रे आणि युद्धाभ्यासचे व्हिडिओही मागितले. त्यानुसार राणा याने त्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठवली.

संपादकीय भूमिका

  • अशा सैनिकांना कठोर शिक्षा होत नसल्याने सतत अशा घटना घडत आहेत. याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक !
  • सैनिकांना आता शारीरिक प्रशिक्षणासह ‘अशा प्रकारे तरुणींच्या जाळ्यात अडकणे देशासाठी किती हानीकारक आहे’, याचेही शिक्षण देणे आवश्यक झाले आहे !