वर्ष २०१३ मध्ये झालेल्या १९ व्या पशूगणना अहवालात देशातील एकूण पशूंमध्ये गायींची संख्या ३७.२८ टक्के इतकी होती. वर्ष २०२० च्या पशूगणनेत ती ३६.०४ टक्के इतकी झाली, म्हणजेच गायींच्या एकूण संख्येत अनुमाने सव्वा टक्क्यांची घटच झाली आहे. त्यातही देशी गायींच्या संख्येत अधिक प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०१३ मध्ये एकूण गायींपैकी ७९ टक्के गायी देशी होत्या. त्यात शुद्ध देशी गोवंश ३७ टक्के आणि देशी गायीत देशी अन् विदेशी संकर होऊन सिद्ध झालेल्या गायींची संख्या ४२ टक्क्यांहून अधिक होती. वर्ष २०२० मध्ये एकूण गायीत भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याविषयी चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येतांना दिसत नाही.
१. देशी गायींची सद्यःस्थिती
वर्ष २०१३ च्या तुलनेत २०२० च्या जातीनिहाय पशूगणनेची तुलना करता देशभरात गीर, साहिवाल, बाचारु, लाल सिंधी, अमृतमहल, बारगूर, कृष्णा व्हॅली या गायींच्या जाती वगळता बाकी बहुतेक सर्व गायींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यात शुद्ध गायींच्या संख्येत झालेली घट चिंताजनक आहे. हरिणा, कंकरेज, कोसाली, राठी, मालावी, हल्लिकर, मालन गिड्डा, गंगातिरी, थारपरकार, निमारी, नागोरी, मोटू, मेवाती, लखिमी, बाडिरी, ओंगोल, कंगायम, पनवार, खिरारी, सिरी आदी २३ देशी गायींच्या संख्येत घट झाली आहे. यापैकी अनेक जाती लहान भौगोलिक प्रदेशात दुग्ध उत्पादन आणि शेतीच्या कामांसाठी उपयुक्त आहेत. बहुतेक ठिकाणी स्थानिक पातळीवर या जातींच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून शुद्ध देशी गायींच्या संख्येत घट झालेली दिसून येते. देशातील एकूण देशी गायींची संख्या १४ कोटी २१ लाख ६ सहस्र ४६६ इतकी आहे. त्यात शुद्ध आणि देशी संकरित गायी यांचा समावेश आहे.
२. महाराष्ट्रातील देशी गायींची सद्यःस्थिती
महाराष्ट्रात खिल्लार, गवळाऊ, लाल कंधारी, देवणी, कोकण गिड्डा या देशी जातींच्या गायी आढळून येतात. त्यापैकी ‘कोकण गिड्डा’ या कोकणपट्ट्यातील गायींची वेगळी जात म्हणून नुकतीच नोंदणी झालेली आहे; मात्र या पशूगणनेत कोकण गिड्डा जातीचा वेगळा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या संख्येविषयी ठोस माहिती मिळत नाही. उर्वरित सर्व देशी गायींच्या संख्येत घट झाली आहे.
लाल कंधारीची वर्ष २०१३ मधील संख्या ४ लाख ५८ सहस्र ४० होती. आता वर्ष २०२१ मध्ये तिची संख्या १ लाख ४९ सहस्र २२१ इतकी झाली आहे. विदर्भातील गवळाऊ गायींच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घट झालेली दिसते.
३. कोणत्या जातींच्या गायी सर्वाधिक आहेत ?
देशात गीर, लखिमी आणि साहिवाल या जातींच्या गायींची संख्या सर्वाधिक आहे. गीरची संख्या ६८ लाख ५७ सहस्र ७८४ असून एकूण गायींच्या संख्येतील वाटा ४.८ टक्के आहे. गायींची गीर जात मूळची गुजरातमधील आहे. एकूण गायींमध्ये सर्वाधिक म्हणजे ३४.७ टक्के वाटा बंगालचा आहे. त्या खालोखाल गुजरात २५.६ टक्के, राजस्थानात १५.२ टक्के, मध्यप्रदेशात ८.८ टक्के, छत्तीसगडमध्ये ६ टक्के, उत्तरप्रदेशात २.९ टक्के, झारखंडमध्ये २.६ टक्के, महाराष्ट्रात २.३ टक्के आणि इतर राज्यात १.८ टक्के आहे. लखिमी जातींच्या गायींची संख्या ६८ लाख २९ सहस्र ४८४ असून एकूण गायींच्या संख्येतील वाटा ४.८ टक्के आहे. त्यानंतर साहिवालचा क्रमांक लागतो. साहिवालची देशातील एकूण संख्या ५९ लाख ४९ सहस्र ६७४ असून एकूण गायींपैकी त्यांचा वाटा ४.२ टक्के आहे. देशात संकरित जर्सी, होलिस्टिन फिर्जियन या विदेशी जातींची शुद्ध आणि संकरित गायींची संख्या ५ कोटी १३ लाख ५६ सहस्र ४०५ इतकी आहे. या गायींचे संगोपन दुग्ध उत्पादनासाठी केले जाते.
४. देशी गायींवर संशोधन होणे आवश्यक
गीर, साहिवाल, लाल सिंधी अशा काही मोजक्या गायींचे दुग्ध उत्पादनासाठी संगोपन केले जाते. इतर गोवंश दुग्ध उत्पादन आणि शेतीसाठी वापरला जातो. देशात ज्या गायी दुधाळ आहेत, त्यावर ब्राझिलसारख्या देशांत संशोधन झाले; पण भारतातील दुधाळ जनावरांवर संशोधन करून दुग्ध उत्पादनात वाढ होईल, असे प्रयत्न कोणत्याच पातळीवर झाले नाहीत. उलट विदेशी जर्सी, होस्टिन फ्रिजियन जातींच्या गायींची संख्या वाढली. देशी गायींच्या संकरीकरणावर भर दिला गेला. त्यामुळे शुद्ध देशी गायी न्यून होत गेल्या आणि मिश्र गायींची संख्या वाढली. यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या कामांसाठी असणारी बैलांची आवश्यकता न्यून झाली. एकूणच देशी गाी वेगाने न्यून होत असून अनेक गायींच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)