राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

  • जोधपूरमध्ये एकाच दिवसात ८४ टक्के पावसाची नोंद !

  • ६ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा !

नवी देहली – देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यात राजस्थान राज्यात गेल्या ३ आठवड्यांत हंगामातील ७० टक्के पाऊस पडला. जोधपूरमध्ये हंगामातील ८४ टक्के पाऊस हा केवळ २६ जुलै या एकाच दिवशी पडला. २६ जुलैच्या सायंकाळपर्यंत येथे १८० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानसह गुजरात, मध्यप्रदेश, सिक्कीम, बंगाल आणि गोवा या राज्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. तेथे अतीवृष्टीची चेतावणी देण्यात आली आहे.

मध्यप्रदेशमध्येही पावसाचा कहर !

मध्यप्रदेशमध्ये २६ जुलै या दिवशी भोपाळ, गुणा, सागर आणि बैतूल या जिल्ह्यांमध्ये १ इंचहून अधिक पाऊस पडला. पुढील २४ घंट्यांत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ११५.५ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी !

हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. कुठे ढगफुटी, तर कुठे नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची हानी झाली आहे.

उत्तरप्रदेशात ३० जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस !

उत्तरप्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. यामध्ये पावसाने कानपूरला सर्वाधिक, म्हणजे १६ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ३० जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अनेकांना गमवावा लागला जीव !

  • २६ जुलै या दिवशी बिहारमध्ये ११, तर उत्तरप्रदेशात १० जणांचा वीज पडून मृत्यू झाला.
  • आंध्रप्रदेशातील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ७ जणांना जीव गमवावा लागला आहे.
  • राजस्थानमधील जोधपूर येथे ५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
  • पावसाळा चालू झाल्यापासून गुजरातमध्ये १०० आणि महाराष्ट्रात ११० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलन यांमुळे १९७ जणांना जीव गमवावा लागला आहे.