गुजरातमध्ये ‘लम्पी’ या त्वचारोगामुळे ९९९ गोवंशियांचा मृत्यू

कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये ‘लम्पी’ नावाच्या त्वचारोगामुळे आतापर्यंत ९९९ गोवंशियांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे कृषी आणि पशूपालन मंत्री राघवजी पटेल यांनी दिली. मृत्यू झालेल्यांमध्ये गाय आणि म्हशी यांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे. लम्पी त्वचारोग डास, माशा आदींद्वारे पसरतो. पशूंच्या संपर्कात आल्यावर किंवा दूषित भोजन आणि पाणी यांद्वारेही पसरतो. या रोगामुळे पशूंना ताप येणे, शरिरावर फोड येणे, दूध अल्प देणे आदी लक्षणे आढळून येतात.