मौलवी आणि स्त्रीस्वातंत्र्य !

संपादकीय

मौलवी सदयबकास डुलोव

किर्गिस्तानमध्ये मांसाच्या किमती वाढल्यामुळे तेथील मौलवी सदयबकास डुलोव यांचे पित्त खवळले आहे. या देशात गोमांस, बकरी आणि घोडा यांचे मांस खाल्ले जाते. हे मांस विदेशांतून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांसाच्या किमती वाढल्यावर त्याचा परिणाम किर्गिस्तानला पुरवण्यात येणार्‍या मांसाच्या किमतीवर होतो. हे सत्य बहुदा डुलोव यांना ठाऊक नसावे किंवा त्यांना ते जाणून घेण्याची इच्छा नसावी. त्यांनी मांसाच्या किमती वाढण्याचे खापर महिलांवर फोडले आहे. ‘महिलांचे मांस तेव्हा स्वस्त होते, जेव्हा त्या त्यांच्या मांड्या दाखवू लागतात. मांसाच्या किमती तेव्हाच वाढतात, जेव्हा महिलांच्या मांसाची किंमत घटते’, असे अश्लाघ्य विधान त्यांनी केले. या वक्तव्याला काही प्रमाणात विरोध झाला; मात्र देशातील धार्मिक प्राधिकरणाने ‘डुलोव यांनी कोणत्याही इस्लामी कायद्याचे उल्लंघन केलेले नाही’, असे म्हटले आहे. हे संतापजनक आहे. येथे प्रश्न हा आहे की, या वक्तव्याकडे जागतिक समुदायाने दुर्लक्ष का केले ?

‘मध्य आशियातील एका छोट्याशा इस्लामी देशातील मौलवी काही तरी असंबंध बडबडत असेल, तर त्याला एवढे महत्त्व का द्यायचे ?’, असा प्रश्न काहींना पडणे साहजिक आहे. जगभरातील मुल्ला-मौलवींच्या फतव्यांचा अभ्यास केल्यास, त्यांची स्त्रीविरोधी मानसिकता यातून दिसून येते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येथे कळीचे सूत्र म्हणजे ‘महिलांचा प्रश्न’, ‘महिलांचे सक्षमीकरण’ ‘महिलांचे स्वातंत्र्य’ याविषयी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात बोलले अथवा लिहिले जाते. स्त्रीस्वातंत्र्याच्या विरोधात बोलणार्‍यांवर टीकेची झोड उठवली जाते; मात्र ‘मुल्ला-मौलवींनी काढलेली वक्तव्यांची नोंद का घेतली जात नाही ?’ हे विचार करण्यासारखे आहे.

वर्ष २००७ मध्ये इजिप्तमधील अल्-अझर विद्यापिठातील डॉ. इज्जत अतिया या इस्लामी विद्वानाने ‘महिलांना पुरुषांसमवेत काम करायचे असल्यास त्यांनी पुरुष सहकार्‍यांना स्तनपान करावे’, असा फतवा काढला होता. वर्ष २०११ मध्ये युरोपमधील एका मौलवीने ‘केळी अथवा काकडी यांचे महिलांनी सेवन करू नये; कारण त्यांना पाहून महिलांमधील लैंगिक भावना जागृत होतात’, असा फतवा काढला होता. स्त्रीला हीन लेखण्याची मानसिकता यातून दिसून येते. जगभरात महिलांच्या विरोधात असे फतवे काढले जातात. इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत. हिंदु धर्मामध्ये कथित अयोग्य चालीरिती, जातीव्यवस्था आदी असल्याचे सांगत ‘डिसमेंटलिंग हिंदुइझम’ अशासारखे कार्यक्रम जागतिक स्तरावर आयोजित करून हिंदु धर्मावर आघात केले जातात; मात्र कधी ‘इस्लामची धर्मचिकित्सा करा’, अशी मागणी केली जाते का ? जिहादी आतंकवाद, मुसलमानेतरांवर वाढत चाललेले अत्याचार आदी पहाता अशी मागणी कुणी केल्यास आश्चर्य ते काय ?